आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Intellectual Activities In Akhil Bhartiya Natya Sammelan

आयोजकांच्या गैरव्यवस्थेमुळे ‘संमेलन प्रयोग’ रंगलाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी - उद्घाटनाआधी झालेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि संमेलनाध्यक्ष फैयाज यांची प्रकट मुलाखत वगळता बेळगावातील नाट्यसंमेलनाचा प्रयोग फारसा रंगलाच नाही अशी प्रतिक्रिया नाट्यरसिकांतून उमटली. ठरलेले कार्यक्रम रद्द होणे, ऐनवेळी त्यांची जागा बदलणे आणि काही कार्यक्रम मध्येच थांबवणे यामुळे नाट्यरसिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोड झाला.

जाहीर झाल्यापासूनच नानाविध कारणांनी हे संमेलन वादग्रस्त ठरत होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींच्या सीमाप्रश्नाबाबतच्या विधानापासून ते नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी वीणा लोकूर यांच्या हटवादी भूमिकेपर्यंत, कर्नाटकाच्या प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेपासून ते एकूणच नियोजनातील ढिसाळपणापर्यंत अनेक उणिवाच समोर आल्या. स्थानिक संयोजकांच्या गैरव्यवस्थापनाचा पावलोपावली प्रत्यय आला.

संमेलनाची दिंडी उशिरा आल्याने उद्घाटक शरद पवार यांना अर्धा तास व्यासपीठावर ताटकळत बसावे लागले. यानंतर पवारांनीही भाषण वाचून दाखवले. याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून सुरू असलेला संगीत मैफलीचा कार्यक्रम अर्ध्यातूनच संपवण्यात आला. त्यानंतर विजय कदम यांची ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाट्य सुरू झाले. त्याला रसिकांची चांगली उपस्थिती होती. मात्र, हेही वगनाट्य कायद्याचा बडगा दाखवत अर्ध्यातूनच बंद करण्यात आले, जे रविवारी दुपारी पुन्हा दाखवण्यात आले.

स्टॉलधारक त्रस्त
नाट्यनगरीत प्रकाशक आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी कार्यक्रमाचे ठिकाण बदलल्याने रविवार असूनही रसिक इकडे न फिरकल्याने पुस्तकांचा खप न झाल्याने स्टॉलधारकांनी निदर्शने केली. अखेर माेहन जोशींनी या सर्वांची समजूत काढली.

कलाकारांच्या हाती तबला, पेटीचे ओझे
संमेलनात रविवारी दुपारपर्यंत मुख्य रंगमंचावर जे कार्यक्रम होते ते नंतर तीन किलोमीटरवरील जिरगे सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. रसिकांना याची कल्पनाच नव्हती, तर तिकडे जिरगे सभागृहात कोणीही स्वयंसेवक नव्हते त्यामुळे कलाकारच पेटी आणि तबला हातातून वागवताना दिसत होते. त्यांना रंगमंचावर व्यवस्था करून देण्यासही कोणी नव्हते.