आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Salute To CM From Now, Fadanvis Took Decision

मंत्र्यांना मानवंदना बंद, ब्रिटिशकालीन राजेशाही परंपरा यापुढे होणार खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - दिवसा, रात्री-अपरात्री कधीही मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार म्हटले की सर्किट हाऊसवर मानवंदना पथक हजर असायचे. बहुतेक वेळा मंत्री उशिरा यायचे. त्यांची येण्याची आणि जाण्याची वेळ कधी ठरलेली नसायची आणि मग हे २० जणांचे पथक तिथेच ताटकळत उभे राहायचे. गेली अनेक वर्षे चाललेली ही राजेशाही थाटातील परंपरा आता बंद होणार आहे. ही मानवंदना बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तसे पत्रही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

मंत्र्यांना जिल्ह्याच्या शासकीय विश्रामगृहावर पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्याची पध्दत ब्रिटिश काळापासून सुरू आहे. मंत्र्यांना उभारण्यासाठी एक छोटा उंच स्टूलही आणला जातो. मंत्री आल्यानंतर आणि नंतर दौरा संपवून जाताना अशी दाेनदा मानवंदना दिली जाते. मात्र, यासाठी प्रत्येक ठिकाणी १५ ते २० पोलिस राखीव ठेवावे लागतात. केवळ मंत्र्यांची वाट पाहणे आणि त्यांना येताना आणि जाताना मानवंदना देणे हेच त्यांचे काम असल्याने तासन््तास तिष्ठत बसून राहणे हेच या पाेलिसांना काम होते.

प्रत्येक जिल्ह्यात धडकले अादेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अाता मंत्र्यांना मानवंदना बंद करण्याचे निर्देश एका अादेशाद्वारे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी १३ एप्रिल २०१५ रोजी आदेश काढून अशा प्रकारची मानवंदना बंद करावी, असे आदेश प्रत्येक िजल्ह्यांना दिले आहेत.

सहकारमंत्र्यांचा पुढाकार
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात सत्तेवर येताच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा या विषयाला तोंड फोडले हाेते. एवढे पोलिस मंत्र्यांच्या सलामीसाठी थांबवण्यापेक्षा त्यांना जनतेची कामे करू द्या, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आणि आपल्यापुरती मानवंदना घेण्याचे नाकारले. ही ब्रिटिशकालीन पद्धत बंद करावी यासाठी आपण इतरांचे मन वळवू व मुख्यमंत्र्यांकडेही असा आग्रह धरणार असल्याची भूमिका पाटील यांनी घेतली होती. त्यात त्यांना यश अाले अाहे.