आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Give Toll,After Kolhapur Sangali, Solapur Citizens Determine Toll Free

टोल देणार नाही!,कोल्हापूरपाठोपाठ सांगली, सोलापूरकरांचाही टोलमुक्तीचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली/ सोलापूर - मुदत संपल्यानंतरही सुरू असलेली टोलवसुली बंद करावी, या मागणीसाठी सांगलीकरांनी बुधवारी कडकडीत बंद पाळून कोणत्याही स्थिती टोल भरणार नसल्याचा निर्धार केला. तर दुसरीकडे, दुरवस्था झालेल्या रस्त्यांवरही ‘जिझिया कर’ वसुली होत असल्याबद्दल संताप व्यक्त करून बसपाच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात आंदोलन केले. त्यामुळे कोल्हापूरपासून सुरू झालेले टोलविरोधी लोण राज्यभर पसरत असल्याचे दिसून येते.
मुदत संपलेल्या टोलची वसुली थांबवण्यासाठी कृती समितीने बुधवारी सांगली बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर दुपारी कोल्हापूरच्या टोलविरोधी आंदोलनाचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. ‘ठेकेदारावर खंडणीचे गुन्हे दाखल करा. शासनाने कोणतेही काम पाच वर्षांतच पूर्ण करावे. वर्षानुवर्षे लोकांवर करांचा बोजा ठेवू नये,’ असे त्यांनी सांगितले. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कृती समितीचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, मदन पाटील, जिल्हा सरकारी वकील सी. डी. माने यांची बैठक झाली. मुदत संपल्यानंतरही सुरू असलेली वसुली थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने पुनर्याचिका दाखल करण्याचा उपाय यावेळी सुचवण्यात आला. ठेकेदाराने अतिरिक्त केलेल्या कामांचे दीड कोटी रुपये सरकारला देणे आहे, मात्र त्याची मागणी 6 ते 7 कोटींची असल्याने न्यायालयातूनच टोल बंदचा निर्णय आणावा लागेल, अशी भूमिका अँड. सी.डी.माने यांनी मांडली.
बसपचा रास्ता रोको
शहरातील रस्ते खराब झालेले असतानाही टोलची आकारणी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बाश्री टोल नाक्यावर आंदोलन केले. आंदोलनाच्या धास्तीने हा टोल नाका सकाळपासून बंद ठेवण्यात आला होता. सुमारे दीड तास आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात एमएसआरडीसीच्या वतीने 59 किलोमीटर रस्ते बनवण्यात आले आहेत. या रस्त्यांपोटी चार नाक्यांवर 20 ते 60 रुपयांपर्यंत टोलची वसुली सुरू आहे. एमईपी कंपनीकडून 31 मे 2006 पासून वसुली सुरू असून ती 2035 पर्यंत चालणार आहे. मात्र, या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
मुंबई टोल फ्री करा, शिवसेनेची मागणी
मुंबईतील रस्ते महापालिका बांधत असून त्याची देखभालही करते, तरीही राज्य सरकार या रस्त्यांवर टोल आकारते. हा अन्याय असून मुंबई टोल फ्री करावी अशी मागणी शिवसेनेचे पालिकेतील स्थायी समिती सभापती राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. पालिकेने शेकडो किमीचे रस्ते बांधले आहेत. त्यांची दुरुस्ती, देखभाल पालिकाच करते, तसेच 253 पुलांचीही देखरेख करते. रस्त्यांसाठी मनपाने कोट्यवधी रुपये खर्च केलेले असतानाही जकातीव्यतिरिक्त मनपा नागरिकांकडून काहीही घेत नसल्याचे शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे.