छायाचित्र: कोल्हापुरातील जाहीर सभेनंतर सोनिया गांधी यांनी व्यासपीठावरून उतरून उपस्थित जनतेशी हस्तांदोलन केले.
कोल्हापूर - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेला जो विराट जनसमुदाय उपस्थित होता, त्याला तोडीस तोड देणारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सभा करू, ही कॉंग्रेस नेत्यांची वल्गना गुरुवारी हवेत विरली. मोदींच्या सभेच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी गर्दी मावणा-या मैदानावर या सभेचे आयोजन करूनही ते मैदान पूर्णपणे भरले नव्हते. स्थानिक मुद्द्यांचा अभाव व जेमतेम दहा मिनिटे झालेले सोनियांचे भाषण उपस्थित जनतेचा उत्साह वाढविण्यातही अपयशी ठरले, असेच वर्णन या सभेचे करावे लागले.
पाच ऑक्टोबर रोजी मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सभा झाली. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच सभा असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. भाजपच्या या शक्तिप्रदर्शनाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसनेही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा करवीरनगरीत आयोजित केली होती. शहरातील मेरी वेदर मैदानावर त्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती. हे मैदान तपोवन मैदानाच्या तुलनेत सुमारे निम्म्या क्षेत्रफळाने कमी असल्याचे सांगितले जाते. सोनियांचे आगमन होण्यापूर्वी अर्धा पाऊण तासापर्यंत अर्धेअधिक मैदान भरल्याने आयोजक नेत्यांच्या चेह-यावर चिंता स्पष्टपणे जाणवत होती. मात्र सोनिया यांचे आगमन होताच पुरेशी गर्दी वाढल्याने आयोजकांच्या जिवात जीव आला.
भाजप- शिवसेना आतून एकच
आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात सोनिया गांधी यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. ‘परदेशातील काळा पैसा अजून देशात का आणला नाही?’ इथंपासून ते ‘खोटी स्वप्ने दाखवत देशातील जनतेची फसवणूक केली’ असे आरोपही त्यांनी केले. शिवसेना- भाजप युती तुटल्याचा संदर्भ देत सोनियांनी हे दोन्ही पक्ष एकच असल्याचा टोला लगावला. मात्र यापैकी एकाही पक्षाच्या नेत्याचे नाव त्यांनी घेतले नाही.
‘जय महाराष्ट्र’ने जिंकली मने
आपल्या भाषणाचा समारोप करताना सोनियांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असा उच्चार करत भाषण संपता संपता का होईना उपस्थित जनतेची मने जिंकली. प्रेक्षकांनीही त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. व्यासपीठावरून खाली उतरताच सोनियांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यांना पाहण्यासाठी व्यासपीठाजवळ धाव घेणा-या महिलांशी त्यांनी हस्तांदोलनही केले. त्यामुळे सुरक्षारक्षक व पोलिसांची धावपळ उडाली.
राष्ट्रवादीचा उल्लेख टाळला
‘इतने दिन हमारे साथ जो थे, वो भी हमसे बिछड गये’ असे एका वाक्यात सोनियांनी राष्ट्रवादीबाबत मत मांडले. मात्र शरद पवारांच्या पक्षाचा संपूर्ण भाषणात एकदाही उल्लेख त्यांनी केला नाही. कॉंग्रेस पक्षच महाराष्ट्राला प्रगतीकडे नेऊ शकतो, हे सांगण्यास मात्र त्या विसरल्या नाहीत.