आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला शिक्षक आता अन्य विषयही शिकवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- कला शिक्षक आता चित्रकला, कार्यानुभव याबरोबरच अन्य शालेय विषय शिकवण्यासही पात्र ठरणार आहेत. ‘एटीडी’ अभ्यासक्रमात शालेय विषयांचा समावेश करणारा बदल समितीने सुचवल्याने कला शिक्षकांचा ‘वर्कलोड’ आता वाढणार आहे. अभ्यासक्रम समितीने आपला अहवाल कला संचालनालयाला सादर केला असून त्यावर तज्ज्ञ समितीचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे जाणार आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाचा विपर्यास करत एटीडीधारकांना वर्कलोड नसल्याचे कारण पुढे करत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधून कायम नोकरी देण्यास टाळाटाळ केली जात होती. केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यात कला शिक्षकांना झुकते माप देण्यात आले आहे, तरीही राज्य शासनाने मध्यंतरी पैसे नसल्याचे कारण देत कंत्राटी स्वरूपाने नेमलेल्या कला शिक्षकांच्या सेवेचा कालावधी वाढवला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून माध्यमिक शाळांमधून कला शिक्षकांची पदेच भरली जात नाहीत. डीटीएडधारक शिक्षक कला विषय शिकवू शकतो, असे कारण सांगत शिक्षण संस्थाचालक कला शिक्षकाची पदे भरत नसल्याचे दिसून येते.
हे असतील नवे विषय
एटीडीच्या नव्या अभ्यासक्रमात कार्यशिक्षण, प्रसंगोपात सोपे व उत्पादक उपक्रम, शारीरिक शिक्षण, प्रादेशिक भाषा मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र व प्रशासन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, व्यक्तिशीर्ष अभ्यास, प्राथमिक शिर्शण व कला शिक्षण : सद्य:स्थिती समस्या व उपाय, इतिहास : कला व संस्कृती, शिक्षणशास्त्र व शालेय व्यवस्थापन आणि नियोजन, प्रायोगिक कला हे विषय नव्याने समाविष्ट करण्यात येतील. तर पूर्वीच्या अभ्यासक्रमातील स्क्रीन प्रिंटिंग, बाहुलीकाम हे कालबाह्य विषय वगळण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या बदलाची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे.
कलाशिक्षकांवरील कामाचा ताण वाढणार
कला महाविद्यालयांतून शिकवला जात असलेला एटीडीचा अभ्यासक्रम 1999 ला तयार करण्यात आला आहे. गेल्या 14 वर्षांत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एकूणच शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. ते एटीडीच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी राज्य कला संचालनालयाने नेमलेल्या अभ्यासक्रम समितीने एटीडीच्या अभ्यासक्रमाची फेररचना केली आहे. या बदलामुळे आता कला शिक्षक डीटीएडधारकाप्रमाणे मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र, शारीरिक शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान हे विषयही शिकवू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचा वर्कलोडही वाढणार असून एकशिक्षकी किंवा दोन शिक्षकी शाळांतूनही शिकवण्यास ते पात्र ठरणार आहेत.