आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offense Registered Against R R Patil In Karnataka

प्रक्षोभक भाषण केल्‍यावरुन गृहमंत्री आबांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांच्या सत्कारप्रसंगी प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगाव आणि परिसरातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते आणि गट एकत्र आल्यानंतर 7 एप्रिल रोजी ठाकूर यांच्या एकसष्टीच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आर. आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘या भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व आमदार निवडून आले तर कर्नाटकला हाताच्या बोटावर नाचवू,’ असा इशारा पाटील यांनी या वेळी भाषणात दिला होता. कर्नाटकातील भाजप सरकारचा पाच वर्षांचा कालावधी हा विकासकामे करण्यापेक्षा गटबाजीत गेला आहे, अशा शब्दात पाटील यांनी कानडी सरकारच्या कारभाराचे वाभाडेही काढले होते. ही टीका तेथील सरकारला चांगलीच झोंबली.

आबांच्या भाषणाचे कन्नड, इंग्रजीत भाषांतर
गृहमंत्री पाटील यांच्या या भाषणाची सीडी मिळवून पोलिसांनी या भाषणाचे कन्नड आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करून घेतले. यानंतरच पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचाच झेंडा फडकला आहे. सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी जनतेत कानडी सरकारविरोधात रोष असतानाच आता त्यांची बाजू घेणार्‍या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर कारवाई झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

आचारसंहितेचा भंग
या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन कर्नाटक सरकारने पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ पोलिस व महसूल अधिकार्‍यांकडून चाचपणी केली होती. अखेर बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास बेळगावच्या मार्केट पोलिस ठाण्यामध्ये पाटील यांच्यावर प्रक्षोभक भाषण करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.