आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार- दोघांसह सुरुवात, समारोप मात्र गर्दीने..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - अश्लाघ्य वक्तव्य करणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आठ दिवसानंतर आपल्या चुकीबद्दल पश्चात्तापबुद्धी झाली. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी आत्मक्लेश केला. पवारांसोबत सुरुवातीला चार- दोनच लोक उपस्थित असलेल्या प्रीतिसंगमावर दुपारनंतर मात्र नेतेमंडळी व माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. समारोपप्रसंगी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच माध्यमांसमोर करून दादांनी मौन बाळगणेच पसंत केले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मूळ गाव असलेले कराड, विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही गाव. येथील समाधिस्थळाला सामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. नुकतीच यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली, त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते या ठिकाणी नतमस्तक होऊन गेले होते. यशवंतराव शरद पवारांचे राजकीय गुरू मानले जातात. आणि अजित पवारांचे राजकीय गुरू त्यांचे काका शरदराव. अशा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले हे ठिकाण म्हणूनच अजित पवारांनी आत्मक्लेशासाठी निवडले असल्याची राजकीय वतरुळात चर्चा होती.

अजित पवारांचे मौन
‘प्रसिद्धीसाठी नव्हे तर पश्चात्तापासाठी येथे आलोय,’ एवढेच वक्तव्य पवारांनी माध्यमांशी केले, नंतर मौन पाळणेच पसंत केले. इतकेच नव्हे तर उपोषण संपल्यानंतरही काहीही न बोलता ते थेट मुंबईकडे निघून गेले. या दौर्‍यात दादांनी लालदिव्याची गाडी टाळून खासगी गाडीला पसंती दिली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी मात्र ‘अजितदादा आगे बढो’च्या घोषणा देत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.

हे तर पूर्वनियोजित?
उपोषणाविषयी वरिष्ठ नेत्यांसह कोणालाही माहिती नसल्याचे खुद्द पवारांनीच सांगितले. मात्र, दुपारनंतर दादांचे सर्मथक, आमदार, सातार्‍याचे पालकमंत्री रामराजे निंबाळकर, गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगार मंत्री हसन मुर्शीफ यांनी हजेरी लावली. उपोषणस्थळी मंडप टाकण्यात आला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेले उपोषण पावणे सहाच्या सुमारास संपले तेव्हा आर. आर. पाटील यांच्याशिवाय कोणीही माध्यमांशी बोलले नाही, त्यावरूनही हे पूर्वनियोजित ठरले होते काय? अशी चर्चा होती.