आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padma Shri Smt.Yamunabai Vikram Waikar Celebrate 100 Birthday

आजही म्हणावीशी वाटते ‘झुळूक वार्‍याची हवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - पद्मश्रीपुरस्कार, टागोर अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार, राज्य शासनाचा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, जागतिक मराठी परिषद, लोकरंगभूमी यांसारखे असंख्य पुरस्कार पटकावणार्‍या आपल्या लावणीने केवळ देशवासीयांना भुरळ घालणार्‍या यमुनाबाई वाईकर यांनी बुधवारी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. ‘झुळूक वार्‍याची हवा सुटली, तशी पतंगाची मजा वाटली’ ही छक्कड लावणी वेगवेगळ्या पंधरा अदांनी साकारणार्‍या यमुनाबाईंना आजही ही लावणी म्हणावीशी वाटते. खुद्द त्यांनीच ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही भावना व्यक्त केली.

यमुनाबाई विक्रम जावळे अर्थात यमुनाबाई वाईकर यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच गायनाला सुरुवात केली. खरे तर पोट भरण्यासाठी त्या वेळी सुरू करावी लागलेली लावणी नंतर त्यांच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनली याच लावणीने नाव झळकवले. आई गीताबाईकडून गायनाचे धडे घेतल्यावर यमुनाबाईंना उस्ताद फकीर महंमद यांनी शास्त्रीय संगीत शिकवले. छक्कड लावणी म्हणजे शृंगारिक प्रकारची लावणी. या लावण्यांमधून रसिकांपर्यंत कसे पोहोचायचे, चेहरा- अदाकारीने प्रेक्षकांचे मन कसे जिंकायचे हे महंमद फकीर यांनी यमुनाबाईंना शिकवले. ‘नेसली पितांबर जरी गं.., तुम्ही माझे सावकार, जिवलगा.., अर्धा विडा आपण घ्यावा .., सजना पहाट झाली’ या त्यांच्या लावण्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांच्यासाेबत झालेली जुगलबंदी आजही मनात घर करून राहिल्याचे यमुनाबाई सांगतात.

सिनेमातल्या लावणीबाबत खंत
आज शंभराव्या वर्षात पदार्पण करताना मनात कोणाबद्दलही कटुता नाही, राग नाही. जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता आहे. खंत आहे ती लावणी ज्यांनी जिवंत ठेवली त्या कलावती पडद्याआड गेल्याची. त्यांना प्रतिष्ठा मिळाल्याची. मला पुरस्कार मिळाले, कष्टाचे चीज झाले; पण सिनेमातल्या लावणीने मूळ लावणी शिल्लक राहिली नाही, याची खंत नक्कीच वाटते. पुढचा जन्म मिळाला तर देवाला सांगेन की, चांगल्या घरात जन्माला घाल, अशा भावना यमुनाबाईंनी व्यक्त केल्या.

लावणीने चेहरा उजळतो
यमुनाबाईंचा भव्य सत्कार करण्याची इच्छा त्यांचे भाचे शशिकांत जावळीकर यांनी बोलून दाखवली आहे. यमुनाबाईंच्या जीवनावरचे पुस्तक मुंबई विद्यापीठात आहे, मात्र पुणे किंवा कोल्हापूरच्या विद्यापीठात का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यमुनाबाईंची तब्येत आता बरी नसते, विस्मरण होते. मात्र, लावणीचा विषय काढला की त्या आजही अनेक लावण्या अदाकारीसह म्हणून दाखवतात, त्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर अलौकिक समाधान जाणवत असल्याचे शशिकांत सांगतात.