Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Panasare Murder Accused To Be Freed Today

पानसरे हत्या प्रकरण: 21 महिन्यानंतर समीर गायकवाड कैदेतून सुटका, सशर्त जामीन मंजूर

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 19:08 PM IST

कोल्हापूर-कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाड याचा शनिवारी सशर्त जामीन मंजूर झाला होता. मात्र वेळेअभावी कारागृहातून सुटका होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे न पूर्ण केल्याने आणि दोन जामीन न देता आल्याने आज सोमवारी समीर गायकवाड याची कारागृहातुन सुटका झाली. समीर गायकवाड गेल्या २१ महिन्यापासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैदेत होता. आज सायंकाळी ५ वाजून १० मिनिटानी समीरची सुटका करण्यात आली.

समीर कारागृहाबाहेर आल्यानंतर त्याने सर्वप्रथम त्याचे वकील समीर पटवर्धन, आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांची भेट घेतली. त्यानंतर सनातन संस्थेच्या एका साधकाच्या चारचाकी वाहनातून तो आपल्या घरी सांगलीला रवाना झाला.
गेल्या २१ महिन्यांपूर्वी समीर गायकवाड याला सांगली येथील त्याच्या निवासस्थानातून पानसरे हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी चारवेळा समीरच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्या न्यायालयाने समीरच्या वकिलांनी शनिवारी न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादाला ग्राह्य मानून त्याची काही अटींवर आणि २५ हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज समीर गायकवाड याची तब्बल २१ महिन्यांच्या कालावधीनंतर जामिनावर कारागृहातून सुटका झाली.

कारागृहातून बाहेर आल्या नंतर पुन्हा पोलीस समीर गायकवाड याला अटक करतील का? या चिंतेत कारागृहाबाहेर उपस्थित सनातन संस्थेचे साधक दिसत होते. मात्र समीर वाहनात बसून त्याच्या घराकडे रवाना झाल्यानंतरच या सर्व साधकांनी सुटकेचा श्वास घेतला.

Next Article

Recommended