आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pandit Bhimsen Joshis Grandson Viraj Singing Song, Divya Marathi

स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची तिसरी पिढी ‘विराज’मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या घराण्यातील तिसर्‍या पिढीचा संगीताच्या क्षितिजावर उदय झाला आहे. भीमसेनजींचा दहावर्षीय नातू विराज याने मिरजेतील अब्दुल करिमखाँ संगीत महोत्सवाच्या सांगता समारोहात नुकतीच गायनसेवा केली.

पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या अवीट गायकीने सार्‍या जगालाच वेड लावले होते. संगीतरत्न अब्दुल करिम खाँसाहेब हे भीमसेनजींचे गुरू. खाँसाहेबांच्या नावे मिरजेतील मीरासाहेबांच्या ऊरुसानिमित्त भरणारा संगीत महोत्सव म्हणजे देशभरातील संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे तीर्थक्षेत्रच. या संगीत महोत्सवात अनेक ख्यातकीर्त कलाकारांनी आपली संगीतसेवा रुजू केली आहे. भीमसेनजींनीदेखील अनेकदा या समारोहात गायन सादर केले आहे. कोणताही मोबदला न घेता या महोत्सवात कलाकार आपली कला सादर करतात.

या वर्षीच्या महोत्सवात भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास हे समारोपाच्या कार्यक्रमाला आले होते. सोबत मुलगा विराजही होता. त्याला गायन सादर करण्याची संधी द्यावी, अशी विनंती र्शोत्यांनी केली. त्याचा आदर राखत विराज याने यमन राग पेश केला. वयाला साजेशा सुरांतून त्याने पंडितजींच्या आठवणी जाग्या केल्या. आजोबांच्याच हिंदी अभंगाने त्याने गायनाची सांगता केली. त्याला रमाकांत राऊत यांनी तबला, तर संदीप गुरव यांनी संवादिनीवर साथ केली.