कोल्हापूर - शास्त्रीय गायनकला ही शब्दप्रधान नव्हे, तर स्वरप्रधान आहे. त्या दृष्टीनेच तिचा आस्वाद घ्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीतज्ञ पद्मश्री पंडित नाथराव नेरळकर यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात सुरू झालेल्या संगीत- नाटक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
पं. नेरळकर यांनी
आपल्या व्याख्यानाला सांगीतिक जोड देऊन जणू दोन तासाची मैफलच रंगवली. ते म्हणाले, संगीत हे आत्मसमाधानासाठी आहे, असे म्हटले जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांसाठी, समाजासाठीच आहे, याची जाणीव संगीताच्या साधकांनी ठेवायला हवी. या क्षेत्रात महान कामगिरी बजावणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांचा आपल्या गायकीवर प्रभाव पडतो, हे खरे आहे.
तथापि, त्यांच्या आवाजाच्या नकलेतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र गायनशैली शोधावी, निर्माण करावी. त्यासाठी अखंड साधना व रियाजाला पर्याय नाही. एखादी मैफल करताना आजही मनावर मोठे दडपण येते, गुरूंचा धाक वाटतो. पण, असे वाटणे हे आपले विद्यार्थीपण कायम असल्याची साक्ष देते. मी आजही संगीताचा विद्यार्थी आहे. गाणे आजही शिकतो आणि शिकवण्याचीही हौस मला आहे. दुसऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे गाणे मन लावून ऐकतो आणि मला ते आवडते. व्यक्तिशः कोणत्याही घराण्याचे मला वावडे नाही. सर्वांची गायकी मला त्यांच्या वैशिष्ट्यांसह आवडते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कोल्हापूरला कलापूर म्हटले जावे, इतके कला, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा आदी सर्वंच क्षेत्रांना दिग्गजांची मांदियाळीच या भूमीने दिली. येथील कला संस्कृतीचा कॅन्व्हास खूपच मोठा असल्याचे ते म्हणाले.
अवघे ८० वयोमान तरी...
एखाद्या कलेला सातत्यपूर्ण रियाजाची जोड दिली तर वयाचेही त्यापुढे काही चालत नाही, याचे प्रत्यंतर पं. नाथराव नेरळकर यांच्या व्याख्यानादरम्यान आले. ८० वर्षे वयाच्या पंडितजींनी रियाजाचा वस्तुपाठच जणू आपल्या गायकीतून विद्यार्थ्यांना दिला. खडा आवाज, दमसाजावर गळ्याचे पूर्ण नियंत्रण, ताना-आलापांमधील चढउतार, त्यातून निर्माण होणारा सांगीतिक आविष्कार यांतून त्यांचे गायकीवरील प्रभुत्व सिद्ध होत होते. या मैफलीत पंडितजींनी विविध रागांतील बंदिशींसह भजने व गझल असे विविध प्रकार अत्यंत ताकदीने पेश करून रसिकांना तृप्त करून सोडले. यामध्ये ‘प्रथम गुरू ध्यान..', ‘कैसे रिझाऊँ अपने बलम को..' या रचनांसह पुरिया रागातील ‘ये रे माही, सुजत नहीं..', दुर्गा रागातील ‘आओ प्रीतम सैंया..' या बंदिशी, ‘रात ऐसी गोठली की..' ही गझल सादर केली. ‘पोटापुरते दे विठ्ठला..' या भैरवीतील भजनाने त्यांनी आपल्या मैफलीची सांगता केली.