आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीप्रभूंना अभिवादन:‘पन्हाळा-पावनखिंड’पदभ्रमंतीतून इतिहासाची उजळण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- छत्रपती शिवरायांची पन्हाळ गडाच्या वेढ्यातून सुटका, महाराजांचा वेश करून हसत हसत मरणाला सामोरे गेलेले शिवा काशिद, महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत गनिमाला खिंडीत अडवून स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांना वंदन करण्यासाठी आखण्यात येत असलेल्या पन्हाळा - पावनखिंड पदभ्रंमतीला तरुणाईचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.
२५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मोहिमा आता आणखी सोप्या झाल्या आहेत. गो. नि. दांडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पन्हाळ्याचे इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांच्यासह अनेकांनी सुरुवातीच्या काळात भर पावसात १३ जुलै रोजी पावनखिंडीत बाजीप्रभूंना अभिवादन केल्याच्या आठवणी सांगितल्या जातात. अशातच कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठान, हिल रायडर्स अॅण्ड हायकर्स, मैत्रेय प्रतिष्ठान, न्यू हायकर्स यांच्यासह अनेक संस्था आता चांगल्या पद्धतीने या मोहिमांचे आयोजन करत आहेत. स्थानिकांसह पुणे- मुंबई व राज्य परराज्यातील अनेक युवक या मोहिमांमध्ये सहभागी होत अाहेत. दरवर्षी किमान पाच हजारांपेक्षा अधिक युवक युवती या मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत.

१६६० मध्ये महाराजांचे सैन्य कशा पद्धतीने या मार्गावरून गेले असेल याची कल्पना करत, शिवाजी महाराज बाजीप्रभूंचा जयघोष करत ही सर्व मंडळी पावनखिंडीत पोहोचतात. तेथे बाजीप्रभूंच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. कुणी शाहीर पोवाडा म्हणतो, कुणी तो प्रसंग कथन करतो आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठीच्या बलिदानाची आठवण ठेवत या ही सर्व मंडळी पुन्हा घरी परततात. दिवसेंदिवस या मोहिमा लोकप्रिय होत असताना आता अनेक नेते, साहित्यिकही या पदभ्रमंतीमध्ये सहभागी होत आहेत.

पुन्हा एकदा इतिहास जागवणाऱ्या या मोहिमा जगण्यासाठीचं बळ देण्यात यशस्वी होत आहेत एवढं मात्र निश्चित.
५० किमी अंतर
सुमारे ५० किलोमीटरची ही माेहीम अाहे. सकाळी लवकर पन्हाळ्यावर वीर शिवा काशिद यांना अभिवादन करायचे. बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याजवळ घोषणा देत या मोहिमांना सुरूवात होते. यानंतर मसाई पठारावरून अनेक रानवाटा, घळी, सरळ रस्ते आणि अनेक चढ उतार चढत दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पावनखिंडीत या मोहिमा पोहोचतात. मध्येच एखाद्या गावामध्ये मुक्कामाची सोय केलेली असते.