आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचावाला ४० वकील; तरीही समीर गायकवाडच्या कोठडीत वाढच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड याच्या बचावासाठी औरंगाबाद, पुण्यासह राज्यभरातून ४० वकिलांचा ताफा आला होता. मात्र सरकार पक्षाच्या युक्तिवादामुळे न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत ३ दिवसांची वाढ केली.

दरम्यान, समीरने मैत्रीण ज्योती कांबळे व बहीण अंजली हिच्याशी पानसरे हत्येबाबत संभाषण केल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला. त्याच्या आवाजाच्या चाचण्या व मानसिक अवस्थेचा अहवाल यायचा असल्याने कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टाने मान्य केली. दुसरीकडे, पानसरे यांच्या हत्येच्या दिवशी समीर ठाण्यात होता, असा दावा त्याच्या वकिलांनी केला. दुपारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी तपासाबाबत माहिती दिली.

ज्योतीचा जबाब नोंदवला : सरकारी वकिलांनी सांगितले, समीरकडून २३ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या घरातून चाकू, कॅमेराही जप्त करण्यात आला आहे. त्याच्या डायरीत रुद्र पाटीलचा उल्लेख आहे. ज्योती कांबळेबरोबरच्या संभाषणात समीरने पानसरे यांच्या हत्येचा उल्लेख केला होता. ज्योतीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. तसेच बहीण अंजली हिच्याशीही तो याबाबत बोलला होता. या पार्श्वभूमीवर २९ मोबाईल सीमकार्डची तपासणी होणे बाकी आहे. त्यासाठी आणखी वेळ मिळणे आवश्यक आहे, कॉल्सची माहिती, कुणाकुणाबरोबर संभाषण झाले त्याच्या सविस्तर नोंदी, ज्यांच्याशी तो बोलला त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करणे, त्याने सांगितलेली ठिकाणे आणि व्यक्ती यांची छाननी यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचे आणि रुद्र पाटील याचे संबंध किती घनिष्ठ होते, या हत्येमध्ये त्यांची नेमकी भूमिका काय आहे याच्याही तपासासाठी आणखी वेळ हवा आहे.समीरच्या संभाषणाच्या आधारे तपास करण्याऱ्या पोलिसांच्या अनेक टीम बाहेर आहेत. तसेच मुंबई आणि गुजरातच्या प्रयोगशाळांकडे त्याचा मानसिक स्वभाव आणि आवाजाबाबतचे अहवाल येणे बाकी आहे. म्हणूनच आणखी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यानंतर समीरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी सरकारी वकिलांचे मुद्दे खोडून काढले. परंतु प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अ. कु. जैनापुरे यांनी समीर याच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली.

समीर निष्पापच, दबावात त्याचा बळी नको : अॅड. पुनाळेकर
समीरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर म्हणाले, समीर फक्त एक संशयित आहे. पानसरे यांच्या हत्येच्या वेळी तो कोल्हापुरात नव्हे तर ठाण्यात होता असे तो सांगत आहे. त्याच्याकडे अनेक सीमकार्ड आहेत. त्यातील एक कार्ड त्या वेळी कोल्हापुरात वापरले गेले असेल. रुद्र पाटील असे म्हणून त्याच्याशी दुसरी व्यक्तीही बोलू शकते. एकूणच पोलिसांच्या तपासाचा रोख हा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आहे. त्यांनी तसाच तपास करावा यासाठी वातावरणनिर्मिती केली गेली. मात्र यामध्ये निष्पापाचा बळी जाऊ नये. समीरला कोठडीत ठेवण्याची गरज नाही. सात दिवसांच्या कोठडीत इतके अधिकारी असताना हे काम का झाले नाही? पोलिसांकडे अजूनही ठोस काहीही मिळाले नाही, असा दावा अॅड. पुनाळेकर
यांनी केला.