आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेंच्या समर्थनार्थ ३०२ वकिलांचा ताफा, समीरच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडच्या पाठीशी ४० वकिलांची फौज उभी करण्याच्या हिंदू विधिज्ञ परिषदेला उत्तर म्हणून राज्यभरातील ३०२ वकिलांनी कॉ. पानसरे यांच्यासाठी वकीलपत्र घेतले आहे. दरम्यान, समीरचे पनवेल येथील दैवत आश्रम आणि गोव्यातील फोंडा येथील रामनाथी आश्रमातील साधकांशी संपर्क असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, ही सरकारी पक्षाची मागणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी मान्य केली आणि कोठडी २८ सप्टेंबरपर्यंत वाढवली.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय कोल्हापूर बार असोसिएशनने घेतला आहे. शनिवारी राज्यभरातील ३०२ वकिलांनी पानसरे यांच्या समर्थनार्थ सरकारी वकिलांना साहाय्य करणाऱ्या अर्जावर सह्या देऊन पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे आज समीरची बाजू मांडण्यासाठी मोजकेच वकील उपस्थित होते. शनिवारच्या सुनावणीदरम्यान अनेक नवीन बाबी पहिल्यांदाच समोर आल्या आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सुरुवातीलाच पार्श्वभूमी सांगून पोलिस कोठडीची मागणी केली. यानंतर सरकारी वकील अॅड. सी.आर. बुधले यांनी पोलिस तपासाबाबत माहिती दिली. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर समीरच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानंतर कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी वैयक्तिक युक्तिवाद केला. त्याला समीरच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मात्र न्यायाधीशांनी घाटगे यांना एकट्यालाच २ मिनिटे युक्तिवाद करण्याची परवानगी दिली.

दोनच डुबक्यांचे रहस्य काय?
साधारणपणे बोलताना आपण चार डुबक्या मारून येतो असे म्हणतो. परंतु समीरचा मित्र सुमित हा दोन डुबक्या मारून येतो, असे म्हणतो. याचा सांख्यिकीय संबंध लावला तर ‘दोन डोकी उडवलीत, आता दोन डुबक्या मारून येतो असा होतो,’ असे सरकारी वकिलांनी सांगितले आणि पानसरे यांच्याबरोबरच नरेंद्र दाभोलकर यांच्याही हत्येमागेही समीर असू शकतो,असे संकेत दिले.
जो नियम नक्षलींना तोच सनातनला हवा
पानसरेंचे विचार सनातनला पटत नव्हते. विचारांना विरोध करणाऱ्यांना संपवण्याचे आदेश ‘सनातन’च्या वृत्तपत्रातून दिले जातात. नक्षलवाद्यांना लावतात तोच नियम ‘सनातन’ला लावावा. संस्थेच्या नेत्यांना अटक करावी. भारतात हिंदू असुरक्षित आहेत, असे वाटणाऱ्या हिंदूंच्या बेकायदा दहशतवादी संघटनांवर बंदी आणावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
लई पापं केल्यात, कुंभमेळ्याला जाऊन येतो
अटकेआधी समीरचे सुमीत घावनकरशी संभाषण झाले. त्यात, ‘ जरा नाशिकला जाऊन येतो. लई पापं केल्यात. दोन डुबक्या मारून येतो…’ असे बोलणे आहे. हा सुमीत कोण, तो काय करतो, लई पापं केल्यात म्हणण्यामागे कोणते पाप आहे याच्या तपासाठी कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.