आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्याकांड: मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची, समीरवर आरोपपत्र दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयावरून अटक करण्यात अालेला ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याच्याविरोधात सोमवारी पोलिसांनी कोल्हापूरच्या न्यायालयात ३९२ पानांचे अाराेपपत्र दाखल केले. दुचाकीवरून अालेल्या दाेघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने पानसरे यांच्यावर गाेळ्या झाडल्या हाेत्या, अशी साक्ष एका १४ वर्षांच्या मुलीने पाेलिसांकडे दिली हाेती. तसेच अाेळखपरेडमध्ये या मुलीने समीरला अाेळखले हाेते, त्यावरून या हत्याकांडात समीरचा सहभाग असल्याचे
स्पष्ट हाेते, असा दावा पाेलिसांनी अाराेपपत्रात केला अाहे.

या अाराेपपत्रात ७७ साक्षीदारांच्या साक्षी घेतल्याची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. तसेच मित्र, मैत्रीण आणि मानलेल्या बहिणीशी केलेल्या आक्षेपार्ह संभाषणाच्या आधारेच समीरला अटक केल्याचाही पाेलिसांचा दावा अाहे.पानसरे हे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, अंधश्रद्धेविरोधात बोलणारे, सनातनवर टीका करणारे व्याख्याते होते. सनातन संघटनेने त्यांच्याविरोधात फोंडा,गोवा येथे तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे पाेलिसांचा संशय या संघटनेवर हाेता. त्यातच समीरच्या घरात छापा टाकला असता त्यात माेबाइल, सिमकार्ड व सनातनचे ग्रंथ सापडले हाेते. ‘या पुस्तकामध्ये पान २३ वर साधकाचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणे म्हणजे क्षात्रधर्म होय’ असे नमूद करण्यात आले आहे. तसेच पान क्र. २४ वर सज्जन आणि दुर्जन यांचे प्रकार दिले असून यातील साधारण दुर्जनाचे मन वळवावे, मध्यम दुर्जनाशी जराशी जबरदस्ती करावी तर अतिशय दुर्जन असणाऱ्याचा नाश करावा’ असा उल्लेख आहे. या सर्व विचारांचा प्रभाव पडल्याने समीरनेच काही अज्ञात अाराेपींच्या मदतीने पानसरे याची हत्या घडवून आणल्याचा निष्कर्ष पाेेलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अाराेपपत्रात काढण्यात आला आहे.
पोलिसांचा संयम
पानसरे यांच्या हत्येचे गांभीर्य अाेळखत पोलिस प्रशासनाने मोबाइल्सचे कित्येक लाख काॅल्स तपासले. यातूनच समीर गायकवाड याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे मोबाइल टॅप केले. त्याचे बाेलणे आक्षेपार्ह वाटल्यानंतर जुलै, आॅगस्ट महिन्यात त्याच्यावर पाळत ठेवली अखेर १६ सप्टेंबरला त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी गडबड न करता पुरावे गोळा करूनच त्याला अटक केले.
फाेनवरच्या संवादाने संशय बळावला

१९ जून २०१५
रात्री ११ वाजून ६ मिनिटांनी समीरने त्याची मैत्रीण ज्योती आनंदराव कांबळे (रा. भांडूप मुंबई) हिच्याशी फाेनवर साधला संवाद.
‘आता पानसरे झाला, आता निखिल वागळे करू का..’
२० जून
दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी ज्योतीने समीरला फाेन केला...
‘तुम्ही रात्री काय बोलला, तुमच्या लक्षात आहे का…’
२१ जून
रात्री १० वाजता पुन्हा त्यांच्यात संभाषण झाले..
‘कोण वागळे व इतर संभाषण’
२७ जून
समीरने त्याचा मित्र सुमित लहू खामणकर (रा. शाळा क्र. ५ जवळ वणी,जि. यवतमाळ)
याच्याशी फाेनवर संवाद साधला...
‘मी जाऊन येतो नाशिकच्या कुंभमेळ्याला. लई पापं केली आहेत. दोन डुबक्या मारून येतो. लई नाही, दोनच केली आहेत.’

२७ जून
रात्री १० वाजून ४४ मिनिटांनी मानलेली बहीण अंजली मंगेशराव झरकर गजानननगर (माळवाडी, जि. बीड) हिच्याशी फाेनवरचा संवाद..
‘त्याला मारायचं आहे. त्याला मारले आहे.. आता कोणी शत्रू नाही.’
पाटील, पानसरे कुटुंबीयांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
संशयित अाराेपी समीर गायकवाडवर साेमवारी दोषारोपपत्र दाखल होण्यापूर्वी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे, मल्हार पानसरे, काॅ. दिलीप पोवार यांनी काेल्हापूरचे जिल्हा पोलिस प्रमुख प्रदीप देशपांडे, तपास अधिकारी एस. चैतन्या यांची भेट घेऊन याही पुढच्या काळामध्ये या प्रकरणामध्ये कसून तपास सुरू ठेवण्याची मागणी केली.
मेघा पानसरे, हमीद दाभोलकर नागपूरला जाऊन नेत्यांना भेटणार
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येसंदर्भात विचारणा करण्यासाठी हमीद दाभोलकर व मेघा पानसरे नागपूरला रवाना झाल्या असून मंगळवार व बुधवारी दोन दिवस हे दोघेही नागपुरात विधिमंडळ अधिवेशनाच्या ठिकाणी विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन या प्रकरणी कसून तपासाची मागणी करणार आहेत. याआधीही तपासावर हमीद व मेघा पानसरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मित्र - मैत्रिणींशी बोलला अन् जाळ्यात अडकला
एकीकडे डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नसताना काॅ. गाेविंद पानसरे यांची हत्या झाल्याने पोलिसांनी याप्रकरणी अतिशय कसून आणि संयमाने तपास सुरू केला. वेगवेगळ्या पोलिस तपास पथकांकडून आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना समीर गायकवाड याचा संशय आला. यानंतर त्याचे दोन्ही मोबाइल टॅप करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली. समीरने आपला मित्र, मैत्रीण आणि मानलेली बहीण यांच्याशी नऊ वेळा संभाषण केले. यात पानसरे, निखिल वागळे यांचे थेट उल्लेख, केलेले ‘पाप’ असे शब्द यामुळे पोलिसांनी समीरला उचलायचे ठरवले आणि १६ सप्टेंबर २०१५ राेजी समीरला सांगलीतून अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...