आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेप्रकरणी ‘एसआयटी’ नेमा, कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ भाकप नेते गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने तो विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देऊन ताे न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी करणारी याचिका पानसरे यांची कन्या स्मिता व सून मेघा यांनी शुक्रवारी हायकाेर्टात दाखल केली.
(फाइल फोटो)

पानसरे यांच्यावरील हल्ल्याला १६ एप्रिल रोजी दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप अाराेपी किंवा सूत्रधारांचा शाेध लागलेला नाही. या दाेन महिन्यांत पाेलिसांच्या विविध पथकांनी सुमारे दीड लाख लाेकांची चाैकशी केली. ३५ पथकांच्या माध्यमातून तपास सुरू अाहे, आंतरराज्य पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊनही पोलिसांना अाराेपींचे धागेदोरे सापडलेले नाहीत. केवळ ‘तपास योग्य पद्धतीने सुरू आहे’ एवढेच सांगण्यात येते. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात अाली अाहे.

पानसरेंचा तपास हे आव्हान
नवे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पानसरे यांच्या हत्त्येप्रकरणाचा तपास हे मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान आपण पेलणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्मा यांनी गुरूवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
महानिरीक्षकांच्या बदलीवरून तक्रारी
विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासात वेग घेतला होता. मात्र, कार्यकाळ पूर्ण हाेण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात अाली. त्यामुळे भाकपसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तपास नेटाने सुरू असताना बदली कशासाठी, असा सवाल करत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
तपास संथ असल्यानेच न्यायालयात धाव
गेले दोन महिने आम्ही सर्व जण या तपासातून काय निष्पन्न होते याची वाट पाहत होतो; परंतु एकूणच तपासाचा वेग आणि दिशा पाहता आम्हांला न्यायालयात धाव घेणे उचित वाटले. त्यानुसारच आम्ही विशेष तपास पथकाकडून तपास व्हावा व तो न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी याचिका शुक्रवारी दाखल केली आहे, असे पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी सांगितले.