आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांकडून चिठ्ठी येताच राज यांनी थांबवले भाषण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मंगळवारी सायंकाळी कोल्हापूरचे गांधी मैदान खचाखच भरलेले... प्रत्येक वाक्याला टाळ्या मिळत होत्या, घोषणाही होत होत्या. या गर्दीचा प्रस्थापित नेत्यांप्रमाणेच पोलिसांनीही धसका घेतला होता. एवढ्या गर्दीत काहीही होऊ शकते, अशी काळजी पोलिस अधिका-यांनी एका चिठ्ठीद्वारे राज यांच्याकडे व्यक्त केली अन् त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

राज यांच्या महाराष्‍ट्र दौ-यातील पहिली सभा कोल्हापुरात झाली, तिने गर्दीचा उच्चांक गाठला होता. सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केली होती, त्यासाठी दोन वाजेपासूनच पश्चिम महाराष्‍ट्रा तील कार्यकर्त्यांचे जत्थेच्या जत्थे मैदानाकडे येत होते. प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटीही सुरू झाली. ज्यांना राज ठाकरे दिसू शकत नव्हते त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. पाठीमागून लोकांचा रेटा वाढतच चालल्याने बसायलाही जागा नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन अनेकजण मध्येच उठू लागले आणि पुन्हा आरडाओरडा सुरू झाला.

नांदगावकरांकरवी निरोप
राज यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. भाषण निम्मे झाले तरी लोक येतच होते. ही रेटारेटी आणि गोंधळ इतका वाढला की राज यांच्या भाषणातही अडथळे येऊ लागले. पोलिसांनाही गर्दीला आवरणे कठीण जाऊ लागले. ही अडचण काही पोलिस अधिका-यांनी एका चिठ्ठीत लिहून आमदार बाळा नांदगावकर यांच्याकरवी राज यांना पोहोचती केली आणि यानंतर राज यांनी लगेचच आपले भाषण आटोपते घेतले.

‘बुफे’ तसाच राहिला
भाषणात बरेच मुद्दे मांडण्यासाठी राज यांनी कागदपत्रे आणली होती. ती टेबलावर मांडून ‘आज तुमच्यासाठी इथे बुफे मांडलाय‘ असे सांगत राज यांनी सणसणीत टोलेबाजीही केली. परंतु गर्दी नियंत्रणात न राहिल्यास अनर्थ घडू शकेल असे वातावरण तयार झाल्याने अखेर त्यांनी भाषण आटोपते घेतले.