आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. पानसरेंचे हल्लेखोर मोकाट, दोन महिने उलटले तरीही तपासात ठोस प्रगती नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला गुरुवारी दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, त्यांचे हल्लेखोर अजूनही मोकाटच असून अथक प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.
(फाईल फोटो - गोविंद पानसरे)

पानसरे दांपत्यावर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चार दिवसांच्या झुंजीनंतर पानसरे यांचा मृत्यू झाला. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागत नसतानाच पानसरे यांनाही प्राण गमवावे लागल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका होऊ लागली.
या हल्ल्यानंतर नुकतेच बदलून गेलेले अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी नियोजन करून तपासकार्य राबवले. शेजारच्या राज्यांतही २५ पथकांच्या साहाय्याने तपासकार्य राबवण्यात आले. मात्र, अजूनही ठोस काहीही हाती लागले नाही. या तिन्ही राज्यांतील सराईत गुन्हेगारांचे अनेक फोटो उमाताई पानसरे यांना दाखवण्यात आले. मात्र, त्यांना हल्लेखोरांना ओळखता आले नाही. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते हेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्या दृष्टीने कसून तपास करण्यात आला, तरीही हल्लेखोरांपर्यंत जाण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

१ लाखापेक्षा अधिक मोबाइल काॅल्सची तपासणी : पोलिसांनी पानसरे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइल टॅावरच्या नोंदी घेऊन सुमारे १ लाख मोबाइल कॉल्सची तपासणी केली आहे. यासाठी ज्यांनी ज्यांनी हल्ल्याच्या आधी आणि नंतर या भागामध्ये मोबाइलच्या माध्यमातून संवाद साधला आहे, अशा सर्वांना कोल्हापुरात बोलावून खातरजमा करण्यात आली आहे.

६०० जणांचे जबाब
पानसरे यांच्यावरील हल्ल्यामुळे शासनावरही आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्याने पोलिसांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सराईत गुन्हेगार, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, नातेवाईक, घराजवळील शेजारी अशा ६०० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून हे जबाब घेण्यात आले. मात्र, तरीही ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.