आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाॅलिटिकल इंजिनिअरिंग’ने वालचंदच्या प्रतिमेला तडा, लौकिकाला गालबोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली- जगाच्या पाठीवर सर्वत्र कार्यरत असलेले सुमारे ३० हजार गुणवान अभियंते घडवणाऱ्या सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला सध्या राजकीय आखाड्याचे स्वरूप आले आहे. नियामक मंडळाने साठ वर्षांच्या मेहनतीने मिळवलेला लौकिक ‘एमटीई’ (महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन) सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांच्या लालसेपोटी काळवंडत आहे. संस्थेचा अध्यक्ष कोण, हे नेमकेपणाने ठरत नाही, तोपर्यंत हा घोळ कायम राहील, अशी सध्याची स्थिती आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या एमटीई सोसायटीचा बाडबिस्तारा काही वर्षांतच म्हणजे १९५४ सालीच गुंडाळण्याच्या स्थितीत होता. त्याकाळी तंत्रशिक्षणाला सरकारचे अर्थसाहाय्य नसल्याने संस्थापक धोंडोपंत साठे यांनी ही संस्था चालवण्यासाठी हिराचंद वालचंद ट्रस्टला आवाहन केले. १९५६ मध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी ‘एमटीई’ आणि हिराचंद वालचंद ट्रस्टचे एकत्रित असे एक नियामक मंडळ स्थापन केले. वास्तविक या नियामक मंडळाचीच एक स्वतंत्र संस्था स्थापन करून हे कॉलेज या संस्थेकडे वर्ग करावे, असे त्या वेळी झालेल्या करारानुसार ठरले होते; तथापि वालचंद ट्रस्ट आणि एमटीई सोसायटीत पहिली ५० वर्षे राहिलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे ही नवी संस्था स्थापन झाली नाही.

१९६५ च्या सुमारास शासनाने वालचंद महाविद्यालयाला अनुदान देऊ केले; पण ते देताना नियामक मंडळात सरकारचे प्रतिनिधी म्हणून तंत्रशिक्षणाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विभागाच्या प्रतिनिधी नेमणे बंधनकारक केले. त्याला ट्रस्ट आणि एमटीईने मान्यता दिली. १९९० पर्यंत नियामक मंडळाच्या समन्वयाने महाविद्यालयाने नेत्रदीपक प्रगती केली. १९९० साली हिराचंद वालचंद यांच्या कुटुंबात विभागण्या झाल्यावर अजित गुलाबचंद यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली. २००७ साली शासनाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा दिला. स्वायत्तता मिळाल्यावर अजित गुलाबचंद यांनी या महाविद्यालयाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ‘हॉक’ या आंतरराष्ट्रीय संस्थेला महाविद्यालयाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम दिले.

अध्यक्षपद पृथ्वीराज देशमुखांकडे
वालचंदमहाविद्यालय नियामक मंडळाच्या ताब्यातून काढून घेण्याच्या आपल्या मनसुब्यांना बळ मिळावे, म्हणून श्रीराम कानिटकर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीला बसवण्याचा घाट घातला. त्यातून २०१० च्या सुमारास त्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांना अध्यक्ष बनवले. देशमुख संस्थेत आल्यानंतर कानिटकर यांनी एमटीईचे त्याकाळचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांना अंगावर घेतले आणि ‘एमटीई कोणाची?’ हा वाद धर्मादाय आयुक्तांकडे गेला. त्याचा अद्याप निकाल लागला नाही.

दरम्यान, नियामक मंडळाने संस्थेला हिशोब दिला नाही, या कारणास्तव पृथ्वीराज देशमुख यांनी संचालक जी.व्ही.पारिशवाड यांना गुंडांचा, पोलिस बळाचा वापर करून पदावरून हटवले. त्यावर अजित गुलाबचंद यांनीही आपल्या काही हुकमी राजकीय पत्त्यांचा वापर करत पहिल्यांदा देशमुख यांना मदत करणारे पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांची उचलबांगडी घडवून अाणली. राजकीय डावपेचांचा वापर करून पारिशवाड यांना पुन्हा पदावर बसवले. सध्याच्या स्थितीत धर्मादाय आयुक्त जोपर्यंत एमटीईचा अध्यक्ष कोण, हे ठरवत नाहीत, तोपर्यंत हा वाद मिटणार नाही. तोपर्यंत महाविद्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप कायम राहील, अशीच स्थिती आहे.

एमटीईकडून अडवणूक
‘हॉक’च्या अनुदानानंतर वालचंदचा केंद्र शासनाने देशातील आघाडीच्या ५० दर्जेदार संस्थांच्या यादीमध्ये समावेश करून ‘टेक्वीप’ या योजनेतून अनुदान दिले. मात्र हे महाविद्यालय ज्या १३० एकरांच्या जागेवर वसले आहे, त्या जागेच्या उताऱ्यावर एमटीई सोसायटीचे नाव होते. दरम्यानच्या काळात वालचंदच्या पॉलिटेक्निक विभागाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले श्रीराम कानिटकर यांची एमटीई सोसायटीचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. कानिटकर यांचा नियामक मंडळाच्या सदस्यांशी जुना वाद असल्याने त्यांनी सूत्रे हाती घेताच ‘वालचंद’ला कोंडीत पकडायला सुरुवात केली. नवी इमारत उभी करण्यात अडथळे आणले आणि इथेच ‘वालचंद’मध्ये वादाची ठिणगी पडली.
बातम्या आणखी आहेत...