आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक पाटलांना गड राखणे कठीण;भाजपचे संजयकाका पाटील यांचे तगडे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - आतापर्यंत केवळ घराण्याच्याच नावावर विजय प्राप्त करणारे काँग्रेसचे उमेदवार आणि वसंतदादा पाटील यांचे नातू आणि प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांची यंदाच्या निवडणुकीत मात्र स्थिती कठीण असल्याचे चित्र मतदारसंघाचा दौरा करताना दिसून आले. भाजपचे संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मतदारसंघासाठी काम न केल्याचा फटका त्यांना बसणार, असे सांगितले जात आहे.

नाट्य आणि सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांगली मतदारसंघात मिरज, सांगली, पलूस कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठे महांकाळ आणि जत असे सहा विधानसभा विभाग येतात. या सहापैकी तीन जागांवर म्हणजेच सांगली (संभाजी पवार), मिरज (सुरेश खाडे) आणि जत (प्रकाश शेंडगे) भाजपचे आमदार असून तासगावमध्ये आर. आर. पाटील आणि इतर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांना 48.74 टक्के, अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांना 43.62 टक्के मते मिळाली होती. 2006 मध्येही पाटील यांनी विजय प्राप्त केला होता. मात्र, ते विजयाची हॅट्ट्रिक करतील ? याबाबत आटपाडी परिसरात फेरफटका मारताना शंका व्यक्त केली जात होती.

कामे न केल्याने प्रतीक पाटील यांच्याविरोधात वातावरण असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि आता भाजपतर्फे निवडणुकीला उभे राहिलेले संजयकाका पाटील यांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भव्य सभा सांगलीत आयोजित करण्यात आली होती. जवळजवळ प्रत्येक विभागात भाजपने प्रचारयात्रा मोठ्या प्रमाणावर काढल्या आहेत. नरेंद्र मोदींच्या नावामुळे तरुण मतदार भाजपकडे वळल्याचे सांगण्यात येत आहे. हे कमी की काय म्हणून काँग्रेसचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनीही नाराज होत अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे.

आटपाडीत फेरफटका मारताना आणि सांगली येथील काही पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतीक पाटील यांना यंदाची निवडणूक कठीण जाणार असल्याचे सांगितले. प्रतीक पाटील यांनी आपल्या मतदारसंघासाठी कामे न केल्याने मतदार नाराज आहेत. विभागातील सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत. एकही नवा उद्योग आलेला नाही. बेरोजगारांना रोजगार नाही तसेच टेंभू जलसिंचन योजना लागू करण्यात प्रतीक पाटील यांना अपयश आले आहे. हे त्यांच्याविरोधातील मुद्दे आहेत.

मोदी फॅक्टर : देशात सध्या सर्वत्र नरेंद्र मोदींच्या लाटेची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतूनच भाजपात दाखल झालेल्या संजय काका पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू ठरणार आहे. तसेच प्रतीक पाटील यांच्यावर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे संजयकाकांसाठी येथील वातावरण अनुकूल ठरवण्याची शक्यता आहे.

धनगर समाजही नाराज
तीन दिवसांपूर्वी विभागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या धनगर समाजाबाबत अपशब्द काढले. त्यामुळे धनगर समाज त्यांच्यावर नाराज असून आटपाडीतून त्यांना पूर्वीप्रमाणे भरघोस मते मिळतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या पत्रकाराने सांगितले, संजयकाका पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला असून शिवसेना आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांची पूर्ण मदत त्यांना मिळत आहे. प्रतीक पाटील यांना स्वत:ला आपण या वेळी निवडून येणार नाही याची जाणीव झाली आहे. त्यांच्या देहबोलीतून ते दिसत आहे. त्यामुळे या वेळी ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

नाव शाबूत राहील ?
सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. 1980 ते 84 दरम्यान शालिनी पाटील या काँग्रेसतर्फे खासदार म्हणून येथून निवडून गेल्या होत्या, तर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे वसंतदादा पाटील यांनीही येथून विजय प्राप्त केलेला आहे. 1984 पासून 1996 पर्यंत प्रकाशबापू पाटील सलग चार वेळा खासदार झाले होते. मात्र, 1996 आणि 1998 ला त्यांच्याऐवजी मदन पाटील यांना लॉटरी लागली होती. त्यानंतर पुन्हा 1999 आणि 2004 मध्ये प्रकाशबापू पाटील निवडून आले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील 2006 मध्ये खासदार झाले. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री व क्रीडा राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आले.