आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एका आराेपीचे कोठडीतून पलायन, सांगलीतील प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - भावाच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सचिन किसन हाके या संशयिताने सोमवारी सकाळी प्रात:विधीच्या बहाण्याने पाेलिस कोठडीतून पलायन केले. पाेलिसांच्या ताब्यातून आरोपींनी पलायन करण्याची एका महिन्यातील जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.

कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी येथील सुरेश किसन हाके यांचा ६ जून रोजी खून झाला होता. दहा दिवस याचा तपास केल्यानंतर हा खून सुरेशचा भाऊ सचिन यानेच केल्याचे तपासात स्पष्ट झाले. जमिनीची वाटणी भावाला द्यायला लागू नये, म्हणून भावाचा खून केल्याची कबुली सचिनने दिली होती. त्यानंतर त्याला १६ जून रोजी अटक केली हाेती. न्यायालयाने आराेपीची २३ जुनपर्यंत पोलिस कोठडी रवानगी केली आहे. या प्रकरणात आणखी काहीजणांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यादिशेने सचिनची चौकशी सुरू असताना रविवारी त्याला काही नातेवाईक कोठडीत भेटण्यासाठी आले होते. साेमवारी सकाळी सहाच्या सुमारास सचिनला प्रात:विधीसाठी कोठडीतून बाहेर काढले असता पोलिसांच्या हाताला हिसका देवून सचिन पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.

नातलगांवर संशय
सचिन हाकेला कोठडीतून पळून जाण्यासाठी कोणीतरी सहकार्य केल्याचा संशय पोलिस उपाधिक्षक अनिकेत भारती यांनी व्यक्त केला. त्यानुसार तपास केला जात आहे. शिवाय त्याला भेटायला आलेल्या नातेवाईकांवरही संशय असल्याने त्यांच्याकडेही कसून चौकशी केली जात आहे. आरोपीच्या पलायनप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

महिन्यात दुसरी घटना
कोठडीतून आरोपीनी पलायन करण्यासाठी महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी ३१ मे रोजी तासगाव पोलिस ठाण्यात निवृत्त पोलिस अधिकारयाच्या स्रेहभोजनात पोलिस गुंतल्याचे पाहुन जबरी चोरीतील तीन आरोपींनी पलायन केले होते. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना २४ तासांत अटक केली होती. आता पुन्हा हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...