आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सत्कारणी लावा, पृथ्वीराज चव्हाणांचे मराठा समाजाला आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘बाळासाहेब खेर मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिलीपासूनचे इंग्रजी बंद केले आणि मराठय़ांच्या अनेक पिढय़ा बरबाद झाल्या. नंतर अनेक वर्षे हा निर्णय बदलला न गेल्याने मराठा समाजातील मुले इंग्रजी शिकू शिकली नाहीत. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. याचा विचार करूनच मराठय़ांना आरक्षण दिले आहे. आता शिकून- सवरून हे आरक्षण सत्कारणी लावा,’ असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले.

मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. उद्योगमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री सतेज पाटील, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘इतर जातीवर्गावर अन्याय न करता आणि कायदेशीर घटनेत बसवून आम्हाला आरक्षण द्यायचे होते. त्यामुळेच थोडा उशीर झाला. मी नोकरीपेक्षा शिक्षणातील आरक्षणाला अधिक महत्त्व देतो. म्हणूनच शिक्षणाच्या आधारे मराठा समाजाने उच्चपदस्थ नोकर्‍यांबरोबरच उद्योगामध्ये अव्वल कामगिरी करावी. आरक्षण देणे हा पहिला टप्पा झाला आहे. आता सामाजिक न्यायासाठी दुसरी लढाई सुरू झाली आहे. त्यामध्ये मराठा समाजाने मागे राहता कामा नये,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षण समितीचे अध्यक्षपद दिल्याबद्दल राणेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ‘आम्ही आरक्षण देऊन तुमच्यावर उपकार केले नाहीत. त्यामुळे कोणाचाही जयजयकार करू नका,’ असे ते म्हणाले.

‘कॉँग्रेसची सत्ता न आल्यास आरक्षणाचे खरे नाही’
‘मराठा आरक्षण देण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला. त्यासाठी आम्ही कोर्टातही भांडत आहोत. कायदेशीर आरक्षण हवे असल्यास पुन्हा आम्हालाच निवडून द्या, अन्यथा आरक्षणाचे काही खरे नाही’, अशी भीती कॉँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी रविवारी घातली. छावा संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना ते म्हणाले की, दुसर्‍या पक्षांना आरक्षणाशी देणे-घेणे नाही. ते सत्तेवर आल्यास आरक्षणाचे काही खरे नसल्याचे त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले.

कायदेशीर लढाईला तयार
पूर्ण अभ्यास करून आम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत जी काही कायदेशीर लढाई होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण सत्कारणी लावा : मुख्यमंत्री

(फोटो : मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विनोद तावडे, सतेज पाटील, धनंजय महाडिक , अँड. शशिकांत पवार आदी)