आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या नावाखाली विकृतीच जन्मास अाली, प्रा. अशाेक चाैसाळकरांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘शेतमालाला भाव नाही म्हणून हजारो शेतकरी आत्महत्या करत अाहेत. मात्र, अाजवर कोणत्याही साहित्यिकाने या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार का परत केले नाहीत,’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी रविवारी उपस्थित केला, तर ‘महाराष्ट्राला असहिष्णुतेची फार पूर्वीची परंपरा असून याच विचारातून शिवसेना नावाची विकृती जन्माला अाली,’ असा खळबळजनक अाराेप ज्येष्ठ विचारवंत प्रा. अशाेक चाैसाळकर यांनी केला.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने आयोजित साहित्य संमेलनातील ‘सहिष्णू, असहिष्णुते’वरील परिसंवादाच्या वेळी ते बाेलत हाेते. ‘महाराष्ट्रात असहिष्णुतेची परंपरा शंभर- सव्वाशे वर्षापूवीही अाढळते. महात्मा ज्याेतिबा फुले यांचा खून करण्याचा त्यावेळी याच विचारातून प्रयत्न झाला हाेता. अागरकरांनाही स्वत:ही प्रेतयात्रा पाहावी लागली. मग सन १९६६- ६७ मध्ये शिवसेना नावाची संघटना जन्माला अाली ती एक विकृतीच अाहे. एखाद्या घटनेला जातीय- धर्माचे रंग देऊन अापले वर्चस्व ठेवण्यासाठी विराेधात उभे राहणाऱ्याला संपवण्याची वृत्ती काही लाेकांमध्ये त्यानंतर वाढत गेली. तत्कालिन अामदार कृष्णा देसाईचा खून करण्यापर्यंतही मजल गेली. त्यामुळेच वैचारिक बांधिलकी मानणाऱ्यांनी यापुढच्या काळात एकत्र येणे गरजेचे अाहे,’ असे अावाहनही चौसाळकर यांनी केले.

तत्पूर्वी ‘सहिष्णु आणि असहिष्णु हा मुद्दा व्यक्तिसापेक्ष आहे. शेतकरी आंदोलन, टोल आंदोलन, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न याबाबत सहिष्णू होण्याची गरज नाही. मात्र महाराष्ट्रातील जनता सूज्ञ असल्याने योग्य वेळी योग्य भूमिका ती घेते,’ असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या अामदार नीलम गोऱ्हे यांनी केले. बिहार निवडणुकीच्या अाधी सुरू झालेली ही ‘पुरस्कार वापसी’ नंतर बंद का झाली असा प्रश्न उपस्थित करून आता पुन्हा कुठल्या तरी निवडणुका जाहीर झाल्या की ती सुरू होईल असेही त्या म्हणाल्या.

गाय देव नव्हे पशूच : दाभाेलकर
मध्ययुगीन संतांनी चुकीचा संदेश दिला. मात्र, स्वामी विवेकानंद आणि सावरकर यांनी गायीला देवाचा दर्जा देण्यापेक्षा पशू म्हणूनच पाहिले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती, याकडे दत्तप्रसाद दाभोलकर यांनी लक्ष वेधले. हजारो कुटुंबांचे पुनर्वसन बाकी असताना अजूनही साहित्यामध्ये त्याचे प्रभावी चित्रण झालेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील पुनर्वसन कायदा हा अन्य राज्यांच्या तुलनेत आधुनिक असल्याने याबाबत महाराष्ट्र सहिष्णू आहे, असे मत काॅ. संपत देसाई यांनी व्यक्त केले.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन विजय चोरमारे यांनी केले. यानंतर ज्ञानेश्वर मुळे, चंद्रकुमार नलगे, व्ही. बी. पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या दोन दिवसीय संमेलनाचा समारोप झाला.

शेतकऱ्यांसाठी पुरस्कार वापसी झाली नाही : खाेत
सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्यावर कादंबरी लिहून, कविता वाचून, चित्रपट काढून शेतकरी सोडून सर्व श्रीमंत झाले. वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्यांनाही कांदा ४० रुपये झाला की डोळ्यात पाणी येतं. मात्र, शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला कोणी साहित्यिक पुढे आला नाही. शेतकऱ्याकडे परत करण्यासारखं काही उरलं नाही. मात्र, त्याच्यासाठी कुण्या साहित्यिकाने पुरस्कार परत केल्याचे ऐकिवात नाही. आता साहित्यिकांनी शब्दांचे बुडबुडे न काढता शेतकऱ्यांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरावे.’