आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्रांच्या अनुपस्थितीत नाथाभाऊंची 'सहकार गाथा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- भव्य आणि आकर्षक व्यासपीठ, अालिशान मंडप, भोजनाची उत्तम व्यवस्था अशा शाही वातावरणामध्ये राज्य शासनाच्या सहकार पुरस्कारांचे वितरण येथे शुक्रवारी करण्यात आले. केवळ उणीव भासली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. त्यांच्या अनुपस्थितीत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सहकाराची गाथा गातानाच गैरकारभार करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार नसल्याचे समजताच पुरस्कार विजेत्यांबरोबरच अधिकाऱ्यांनाही नाराजी लपवता आली नाही. या वेळी खडसे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्यातील विविध ३८ सहकारी संस्थांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चांगल्या सहकारी संस्थांना शासन जरूर पाठबळ देईल. मात्र, गैरकारभार करणाऱ्यांची गयही केली जाणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारकांच्या मदतीसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून या सर्व बदललेल्या कायद्यांचा शेतकऱ्यांना आणि सहकारालाही फायदा होईल, असे ते म्हणाले.
५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची कर्जे रूपांतरित करून नवीन कर्जे देण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी जाहीर केले. १०० टक्के महिला आणि १०० टक्के मागासवर्गीय सभासदांच्या संस्थांनाही यापुढे पुरस्कार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

व्यवसायाला मदतीचे आश्वासन
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऊस व्यवसायाला मदत करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. मात्र, इतर उद्योगांप्रमाणे साखर कारखाना हादेखील उद्योगच असल्याने नफा तोट्याचे गणित पाहूनच त्या पद्धतीचा कारभार आवश्यक असल्याचे पाटील सांगितले. या वेळी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा बँकांवर शासनाने नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, सहकार विभागाचे सचिव डॅ. शैलेशकुमार शर्मा, आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह सहकारातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...