आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R.Patil News In Marathi, Gopinath Munde, Nationalist Congress, BJP

\'मुंडेंना सांगलीत गृहमंत्री व्हायचे असते, तर औरंगाबादमध्ये गेले की भावी मुख्यमंत्री\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना सांगलीत आले की त्यांना गृहमंत्री व्हायचे असते, तर औरंगाबादमध्ये गेले की भावी मुख्यमंत्री मीच म्हणून ते सांगतात आणि दिल्लीत गेले की त्यांना कृषिमंत्री व्हायचे असते. ते गाव बदलले की आपली पदे बदलतात. मुंडे माझे चांगले मित्र अहेत; मात्र त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचाराची गरज आहे, असा टोला गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लागवला.


सांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव येथे आयोजित सभेत पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भाजपने गेली दोन वर्षे मोदी मोदीचा जप केला; पण आज मोदींची प्रतिमा छोटी व्हायला लागली आहे. मोदी गुजरातच्या पुढे जाऊ शकले नाहीत, ते देशाचे पंतप्रधान काय होणार? त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांत दिलेली कोणती आश्वासने पाळली, याचा लोकांनी विचार करावा. भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. मोदींचा अश्वमेध महाराष्ट्रातील जनताच रोखेल.’’


सेना संपवण्याचा पद्धतशीर डाव
महायुतीतील धुसफुशीचा धागा पकडून पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेला कमकुवत करण्याचे पद्धतशीर काम सुरू आहे. भाजपने महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी हातमिळवणी करून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची योजना आखली आहे. भाजपचे हे विश्वासघाताचे राजकारण जनताच उघडे पाडेल.’’ तसेच भाजपमध्ये नितीन गडकरी व मुंडे यांचे फारसे जमत नसल्याचे त्याचा फटका बसेल, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.


आता शिवसाखळ्या बांधा
शिवसेनेतून कार्यकर्ते बाहेर पडू नयेत म्हणून मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधनात बांधले, तरीही कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडायचे थांबले नाहीत. कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांनी आता शिवसाखळी बांधली तरी कार्यकर्ते थांबणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.