आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R.R. Patil And Raju Shetty This Two Leaders Mother Work At Farm

दिग्गजांचे कुटुंबीय धुमाळीत अलिप्तच : आबा, शेट्टींच्या मातोश्री घर-शेतीकामातच मग्न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली / कोल्हापूर - आर. आर. पाटील. राष्ट्रवादी काँग्रेसचा अस्सल ग्रामीण चेहरा. आबा राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी सज्ज असले तरी त्यांच्या कुटुंबाचा नित्यक्रम सामान्य लोकांप्रमाणे सुरू आहे. घरासमोर कार्यकर्त्यांची वर्दळ नाही, गावात कुठलाही गाजावाजा नाही. आबांच्या आई भागीरथी (वय ८०) आजही शेतीची कामे पाहत आहेत. आबांची मुलगी िस्मता राजकीय हालचालींचा कानोसा घेत असली तरी मुलगा दहावीच्या अभ्यासात मग्न आहे. सौभाग्यवतींचा नित्यक्रम फारसा बदललेला नाही. अंजनी (ता. तासगाव, जि. सांगली) हे आबांचे गाव.
गावातील सर्व लोक आबांच्या मातोश्रींना काकी म्हणतात. काकी शुक्रवारी दुपारी आपल्या शेतात खुरपण करणा-या महिलांसोबत रमल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही तर शेतात काम करीत आहात, आबांचा प्रचार वगैरे करणार नाही का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “पूर्वी एक दोन-दिवस प्रचाराला जायचे. आता गुडघेदुखीचा त्रास होतो. शेतातली कामंबी बघावी लागतात. प्रचार सुरू झाला की लोकांना भेटेन, पण लय काय करता येणार नाय.” आबांवर अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन टीका होते. आई म्हणून तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर काकी म्हणाल्या,“आबा चांगलं काम करतो, पण त्याच्यावर टीका झाली की वाईट वाटते. चांगले बोलणारेही लोक आहेतच. शेवटी राजकारण आहे. सत्ता असली की लोकांना राजकारण चांगले वाटते, सत्ता नसली की वाईट वाटते. जगाची रीतच आहे.” काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली आहे. तुम्हाला याचे वाईट वाटत नाही का? असे विचारले असता काकी म्हणाल्या, “त्याचं काय ! काँग्रेससोबत भांडूनच राष्ट्रवादी काढली ना? त्यात वाईट वाटायचं काय? आता सगळेच तुटले, बघू काय होतंय ते.” तुमची नात स्मिता राजकारणात प्रवेश करू इच्छित होती. सुप्रिया सुळे यांच्या युवती मेळाव्यांमध्येही त्या दिसल्या. आता त्या राजकारणापासून दूर का आहेत? यावर त्या म्हणाल्या, “होय, आम्हीच तिला थांबवलंय. पुढे बघू, आता तर काय ठरवलेले नाही.”
चांगल्या कामानंतरही आबांवर होते टीका
पूर्वी प्रचाराला जायचे. आता गुडघेदुखीचा त्रास होतो. शेतातली कामंबी बघावी लागतात. प्रचार सुरू झाला की लोकांना भेटेन, पण लय काय जमणार नाय..
भागीरथी पाटील, आबांच्या मातोश्री
खासदार राजू शेट्टी. पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक लोकनेता. गेल्या दहा वर्षांत राजू शेट्टींच्या राजकारणाचा भौगोलिक विस्तार कमालीचा वाढला आहे. शिरोळ (जि. कोल्हापूर) पासून सुरू झालेली संघर्षयात्रा बारामतीला वळसा घालून दिल्लीच्या दरबारात पोहोचली आहे. मात्र शिरोळमधील त्यांचे घर, घरातली माणसं, मुले बदलली नाहीत. शनिवारी दुपारी राजू शेट्टी यांच्या शिरोळ गावी पोहोचलो, तेव्हा त्यांच्या मातोश्री रत्नाक्का शेट्टी (वय ८५) घरामागील शेतात गवत काढत बसल्या होत्या. शनिवारी दुपारी राजू शेट्टी यांचा जयसिंगपुरात निवडणूक मेळावा होता, त्यानंतर ते पुढे इतर गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार होते.
मुलगा राजकीय घडामोडींत व्यस्त असताना त्यांच्या आई शेती, घरातील कामांमध्ये मग्न होत्या. रत्नाक्का म्हणाल्या, “मला एकूण सहा मुलगे, तीन मुली. राजू सगळ्यात लहान. पहिली चार मुले काही वर्षांपूर्वी वारली. आता त्यांच्या बायका, मुले आहेत. या सगळ्यांमध्ये एकूण तीन एकर शेती आहे. मी कधीही निवडणुकीच्या प्रचाराला गेलेले नाही. माझे लग्न झाले तेव्हा महात्मा गांधी नावाचा मोठा माणूस असल्याचे मला समजले होते. त्यानंतर नेहरू, गांधी या लोकांबद्दलच ऐकले होते. मुलांचा सांभाळ करताना आम्ही असल्या राजकारणाचा विचार केला नव्हता. माझ्या मुलावर (राजू शेट्टी) जेव्हा पहिला हल्ला झाला त्यावेळी मला वाईट वाटले नाही, पण मी कधी त्याला थांबवलेही नाही. मुलाला सगळे लोक साहेब म्हणतात, त्यामुळे मीसुध्दा त्याला साहेब म्हणते. सायबाला एकच मुलगा आहे. तो पन्हाळ्याच्या संजीवनी हायस्कूलमध्ये अकरावीत शिकतो. सूनबाई आणि मी घरातली आणि शेतातली कामं बघतो.” मुलगा आणखी कोणत्या मोठ्या पदावर जावा असे वाटते का, असे विचारल्यावर रत्नाका म्हणाल्या, “जे मिळाले ते खूप झाले. सायबाला भेटायला खूप लांब लांबचे लोक येतात. पूर्वी दोनच खोल्यांचे घर होते. खूप लोक भेटायला यायला लागले म्हणून दोन खोल्या वाढवून पत्र्याचे चांगले घर केले. आता यापेक्षा मोठं घर बांधा, असं लोक म्हणतात, पण आपल्याला कशाला पाहिजे? आहे त्यात आम्ही समाधानी आहोत.”

चार खोल्यांच्या घरात आम्ही समाधानी
गांधी, नेहरूंचे नाव ऐकले होते. मुलांचा सांभाळ करताना आम्ही असल्या राजकारणाचा विचार केला नव्हता. मी कधीही निवडणुकीच्या प्रचाराला गेलेले नाही.
रत्नाक्का शेट्टी, राजू शेट्टींच्या आई