आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R R Patil And Patangrao Kadam Benefited Their Own Constituency People

दोन मंत्र्यांनी पळवले कृष्णा खोर्‍यातील पाणी; आबा, पतंगरावांच्‍या मतदारसंघाची चांदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - कृष्णा खोरेअंतर्गत सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यांसाठी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजना आखण्यात आल्या. मात्र, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी केवळ स्वत:च्या मतदारसंघापुरताच विचार करून भीषण दुष्काळातही मूळ योजनेतील तालुक्यांना पाण्यापासून दूर ठेवले आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, जत आणि मिरज तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा अशा पाच तालुक्यांसाठी 1984 मध्ये राज्य सरकारने ताकारी-म्हैसाळ योजनेला मंजुरी दिली. मात्र, युतीची सत्ता येईपर्यंत या योजनेचे काम रखडले होते. युती सत्तेवर आल्यानंतर उभारलेल्या कर्जरोख्यांतून या योजनेच्या कामाला गती आली.

याच काळात सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या पाच तालुक्यांसाठी टेंभू योजना मंजूर झाली. म्हैसाळ योजना सुरू होऊन 28 वर्षे झाली तरी या योजनेच्या पाण्याचा पूर्ण लाभ अजूनही जत, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांना झालेला नाही.

आबांच्या मतदारसंघासाठी 137 कोटी
दहा वर्षांपूर्वी म्हैसाळ योजनेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या तासगाव तालुक्यातील काही गावांचा समावेश केला आणि त्यासाठी 137 कोटी रुपयांची तरतूद करून या गावांना पाणी नेलेही. दरम्यानच्या काळात आर.आर.पाटील यांचा तासगाव मतदारसंघ कवठे महांकाळशी जोडला गेल्यानंतर तेथील पोटकालव्यांची कामे पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे पाणी या तालुक्यातील गावोगावीही पोहोचले.

कदमांच्या ‘कृपे’ने योजनेतील गावे वंचित
वनमंत्री पतंगराव कदम यांनी टेंभू योजनेचे पाणी कडेगाव तालुक्यात येण्यासाठी जेवढी ताकद लावली तेवढी पुढे खानापूर, आटपाडी आणि सांगोला तालुक्यांत जाण्यासाठी लावली नाही, अशी शेतकर्‍यांची भावना आहे. सध्या आटपाडी आणि सांगोला तालुक्यांत भीषण दुष्काळ आहे. आटपाडी तालुक्याला पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 73 कोटी मंजूर केले आहेत. पुढे सांगोला तालुक्याला पाणी देण्याबाबत अद्याप काहीच हालचाली नाहीत. तोपर्यंत पतंगराव कदम यांनी आपल्या मतदारसंघातील तडसर गावाचा टेंभू योजनेत समावेश करून कॅनॉल खोदण्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून घेतले. वास्तविक मूळ योजनेत समाविष्ट गावांना आधी पाणी देऊन नंतर अन्य गावांना समावेश करणे समजण्यासारखे होते. त्याला कोणाची हरकतही नव्हती; मात्र या मंत्र्यांनी मूळ योजनेतील गावांना भीषण दुष्काळातही पाणी पाणी करायला लावल्याबद्दल जनतेत संतापाची भावना आहे.

दुष्काळी निधीतून नेत्याचे उखळ पांढरे
दुष्काळ निवारणासाठी आलेल्या निधीतून म्हैसाळ, टेंभू योजनेची वीज बिले भरली जातात. त्याचा दुष्काळग्रस्तांना लाभ होत आहे; मात्र शेतीसाठी पाणी उपसा करणार्‍यांनाही दुष्काळाच्या नावाखाली फुकटचे पाणी वापरायला मिळत आहे. खानापूर तालुक्यात तर एका नेत्याच्या खासगी साखर कारखान्यासाठी ताकारी योजनेचा एक कॅनॉल वळवण्यात आला आहे. त्याचेही बिलही सरकारच भरते.