कोल्हापूर- राज्यात टोलप्रश्नी जनतेच्या भावना तीव्र आहेत. सरकार म्हणून जबाबदारी पार पाडताना कायदा आणि सुव्यवस्था राखायची की जनतेच्या भावना समजून घ्यायच्या या वादात पोलिस दलाचे सॅंडविच झाले असून, या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केले. हिंसक आंदोलन करणा-यांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्यच असून, मग तो टोलचा विषय असो की इतर कोणताही त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यकच आहे, असेही आबांनी म्हटले आहे.
गृहमंत्री आर आर पाटील यांनी कोल्हापूरला काल भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. आर आर म्हणाले, की टोलप्रश्नी कोल्हापूरकरांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे येथील टोलप्रश्नाचा मुद्दा संपवायचा असेल तर महापालिकेने आयआरबी कंपनीचे पैसे परत कसे करता येतील यावर विचार करायला हवा. सरकारनेही यात लक्ष घातले पाहिजे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसारच कोल्हापूरमधील आयआरबी कंपनीला निशुल्क सुरक्षा यत्रंणा व सेवा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार किंवा पोलिस दल कंपनीला मदत कसे काय करते असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पण जनतेच्या भावना मला समजत आहेत. पण काही कायदेशीर बाबीही पाळाव्या लागतात. त्यामुळे पोलिस दलाचे मधल्या मधेच सॅंडविच होत आहे, असे पाटील म्हणाले.