आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raju Shetty Give 82 Lakh Rupee Compaisation, Kolhapur Collector Decision

राजू शेट्टींनी 82 लाख रूपये भरपाई द्यावी, कोल्हापूर जिल्हाधिका-यांचा ऊस आंदोलनाबाबतचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ऊसदर आंदोलनात जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईपोटी 82 लाख 85 हजार रुपये एक महिन्याच्या आत भरावेत अन्यथा महसुली थकबाकी म्हणून मालमत्तेवर बोजा चढवण्यात येईल, अशी नोटीस कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आणि इतर 77 जणांना बजावली आहे.
साखर कारखान्यांकडून ऊस दर जाहीर होण्यास वेळ होत असल्याने शेतकरी संघटनेने नोव्हेंबर महिन्यात आंदोलन पुकारले होते. तसेच दर जाहीर होईपर्यंत एकही कारखाना सुरू करू नये, असे आवाहनही केले होते. मात्र पश्चिम महाराष्‍ट्रातील काही कारखान्यांनी भाव जाहीर न करताच गाळपास सुरूवात केली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात हिंसक आंदोलन केले. पुणे- बेंगळूर राष्‍ट्रीय महामार्गावरही एस.टी.बसेस फोडण्यात आल्या होत्या. या सर्व आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याप्रकरणी 81 लाख रूपये भरण्याची नोटीस शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीच्या प्रमुख नेत्यांना व कार्यकर्त्यांना बजावण्यात आली आहे.
सूडापोटी कारवाई ?
ऊसप्रश्नी राज्य सरकारविरोधात विशेषत: शरद पवार व अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन छेडणा-या राजू शेट्टी यांनी नुकतेच शिवसेना- भाजप- रिपाइंच्या महायुतीत प्रवेश केला आहे. पश्चिम महाराष्‍ट्रातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये चांगले वजन असलेल्या शेट्टी यांच्या रुपाने आता महायुतीने साखरपट्ट्यात पवारांना चांगलेच आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यानंतर नोटीस बजावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
इंदापूरच्या नुकसानीत आणखी पडली भर
2012 मध्ये इंदापूरात झालेल्या आंदोलनात झालेल्या नुकसान भरपाईपोटी याआधीच दोन कोटी रुपयांची नोटीस शेट्टी यांना बजावण्यात आली होती. आता त्यात आणखी 82.85 लाखांची भर पडली आहे.
आमच्या गाड्या फोडल्या, त्याची भरपाई कोण देणार?, राजू शेट्टी यांचा सवाल
‘सत्ताधा-यांचे पाय चाटणारे हे प्रशासन आहे. गेल्या वर्षी आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली, पोलिसांनी 400 ते 500 मोटारसायकली दगड घालून फोडल्या, जाळल्या, त्याची नुकसानभरपाई कोण देणार?,’ असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, सांगलीतील दंगल, मुरगूड पोलिस स्टेशनवर राष्‍ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला, बांगलादेशींच्या समर्थनार्थ मुंबईत निघालेल्या मोर्चाच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग, शरद पवार यांना दिल्लीत मारल्यानंतर राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्‍ट्रात केलेली तोडफोड, जाळपोळ याची नुकसान भरपाई कधी मागितल्याचे आम्हांला आठवत नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.
कसाबला म्हणणे मांडायला संधी, आम्हाला नाही
पाकिस्तानातून येऊन मुंबईवर अतिरेकी हल्ला करणा-या कसाबला बाजू मांडण्याची संधी दिली जाते. आम्हाला मात्र सांगूनही बाजू मांडण्याची संधी न देता मालमत्तेवर बोजा चढवण्याच्या नोटिसा दिल्या जातात. या राज्यकर्त्यांवर, त्यांचे तळवे चाटणा-या प्रशासनावर आमचा विश्वास नाही. मात्र न्याय व्यवस्थेवर आहे. त्यामुळेच आम्ही तिथेच दाद मागणार आहोत, असे राजू शेट्टी म्हणाले.
कुणी कंत्राट घेतलंय हे
आता स्पष्टच झालं...!
साखर उद्योग उद्ध्वस्त करण्याचं कंत्राट काहींनी घेतलंय अशी बोचरी टीका शरद पवार यांनी शेट्टी यांच्यावर केली होती. याबाबत शेट्टी म्हणाले की, अशा नोटिसा पाठवून कुणी कुणाचं कंत्राट घेतलंय हे सिध्द झालंय. शेतक-यांचे कारखाने फुकापासरी घशात घालू न देण्याचं कंत्राट मी घेतलंय ही वस्तुस्थिती आहे, असा शब्दात त्यांनी पवारांना ठणकावले.