आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ram Naik News In Marathi, Governor, Uttar Pradesh, Divya Marathi

यूपीत खून, अत्याचाराच्या बातम्या वाचाव्या लागतात; राज्यपाल नाईक यांनी व्यक्त केली चिंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राज्यपाल झाल्यानंतर राम नाईक प्रथमच कोल्हापुरात आल्यानंतर त्यांचा रविवारी येथे सत्कार झाला.)
कोल्हापूर - उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रांमध्ये जाहिराती वगळता तर खून, मारामारी, बलात्काराच्याच बहुतांश बातम्या वाचाव्या लागतात, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी तेथील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी आपण सातत्याने चर्चा करत असून तेथील परिस्थिती बदलून या प्रश्न प्रदेशाचे रूपांतर उत्तम प्रदेशात करणार असल्याची ग्वाही नाईक यांनी दिली. येथे रविवारी आयोजित सत्कार समारंभ व पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते या वेळी नाईक यांचा महालक्ष्मीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महेश जाधव उपस्थित होते. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना नाईक यांनी विविध विषयांवर आपली मते मनमोकळेपणाने मांडली.

24 विद्यापीठे असूनही चार वर्षे दीक्षांत समारंभच नाही
गंगा, यमुना नद्यांचा, राम-कृष्णांचा, बुद्ध आणि सुफी संतांचा उत्तर प्रदेश अशी सर्वत्र उत्तर प्रदेशची ओळख असताना तेथील परिस्थिती मात्र या सगळ्यांशी विसंगत आहे. दैनिकातील आठपैकी पाच-सहा पानांत गुन्हेगारीच्याच बातम्या वाचाव्या लागतात. उत्तर प्रदेशात 24 विद्यापीठे आहेत, परंतु अनेक विद्यापीठांचे चार चार वर्षे दीक्षांत समारंभच झालेले नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून आपण काम करत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

राज्यपालांची नियुक्ती राजकीय प्रक्रियेतून
राज्यपालपद हे घटनात्मक असले तरी नियुक्ती करताना ती राजकीय प्रक्रियेतूनच केली जाते. त्यामुळे राज्यपाल, नियोजन मंडळ यावरील नियुक्त असणा-यांनी राजकीय सत्ता बदलल्यानंतर पदाच्या मोहापायी राजीनामा न देणे अयोग्य आहे, असेही मत नाईक यांनी मांडले.

शिक्षकाचा मुलगा राज्यपाल झाल्याचा आनंदच : नाईक
एका शिक्षकाचा मुलगा मंत्री आणि आता राज्यपाल होतो याचे समाधान आहे. सांगली येथे जन्म, आटपाडी आणि पुणे येथे शिक्षण आणि मुंबईत पहिल्यांदा सरकारी नोकरी, नंतर कंपनीत मोठी जबाबदारी आणि पक्षसंघटनेसाठी राजीनामा देऊन पुढची कारकीर्द. हा प्रवास निश्चितच आनंद देणारा असल्याने आपण पूर्णत: समाधानी आहोत, असेही ते म्हणाले.

अन् राज्यपालांनी मंदिरात व्यक्त केली दिलगिरी
राज्यपालपदावर असलेला माणूसही किती विनयशील असू शकतो याची प्रचिती कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरातील भाविकांना आली. नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौ-यावर आले होते. रविवारी सकाळी ते महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. साहजिकच सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून भाविकांना पोलिसांनी थांबवून ठेवले होते. दर्शन झाल्यानंतर नाईक यांनी भाविकांना नमस्कार करून माझ्यामुळे आपल्याला ताटकळावे लागले, असे सांगून दिलगिरी व्यक्त केली.