आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातार्‍यात उदयनराजेंशी आता अशोक गायकवाड भिडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - पूर्वी खासदार उदयनराजेंनाच रिपाइंत येण्यासाठी आग्रह करणारे व आता त्यांच्याविरोधात मराठा समाजाचाच उमेदवार देणार्‍या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सातार्‍यातील महायुतीचा उमेदवार बदलला. यापूर्वी उमेदवारी दिलेले संभाजी संकपाळ स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्यात अपयशी ठेवल्याचा ठपका ठेवत आठवलेंनी आता रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना सातार्‍याच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

महायुतीने 15 दिवसांपूर्वी संभाजी संकपाळ यांना उमेदवारी दिली होती. पण मंगळवारी त्यांचा अर्ज भरताना संकपाळ एकाकी पडल्याचे दिसून आले. रिपाइंचे कार्यकर्ते व शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाबुराव माने यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती. बुधवारी आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा उमेदवार म्हणून अशोक गायकवाड यांचे नाव जाहीर केले. ते म्हणाले की, आमची व्यूहरचना बिघडवण्यासाठी विरोधी पक्षांनी संकपाळ यांना महायुतीत घुसवले होते काय? अशी शंका आम्हाला येत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांची उमेदवारी रद्द केली.

भाजप, मोदीच धर्मनिरपेक्ष
शरद पवार मोदींवर जी टीका करतात ते चुकीचे आहे. उलट मोदी किंवा भाजप हेच धर्मनिरपेक्ष आहेत. कॉंग्रेसने मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने राष्ट्रवादीचे व कॉँग्रेसचे कार्यकर्ते चिडलेले आहेत. केवळ इतिहासाचे तपशील चुकले म्हणून मोदींना पंतप्रधान होण्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे आठवले म्हणाले. नेहमीप्रमाणे आठवले यांनी एक शीघ्र कविता सादर करून टाळ्या मिळवल्या.
उदयनराजेंवर आली आहे धाड,
आरपीआयने दिला आहे अशोक गायकवाड
उदयनराजेंचे झाले आहेत लाड,
म्हणून अशोकला सांगतो त्यांना पाड...!

सोशल इंजिनिअरिंग फसली
सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग म्हणून रिपाइंने सातार्‍यात मराठा समाजातील संकपाळ यांना उमेदवारी दिली होती. यामुळे आमच्या पक्षाची वेगळी ओळख निर्माण होईल, अशी आशा होती. मात्र, आमचा हा प्रयोग फसला असल्याची कबूली आठवले यांनी दिली. ऐनवेळी उमेदवार बदलला असला तरी सातार्‍याची जागा आम्ही जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.