आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramdas Athwale Made Laughing Environment At Mahayuti First Meet

महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत रामदास आठवले यांच्या कवितांनी उपस्थितांना हसवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इचलकरंजी - महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या शीघ्र कवितांनी उपस्थितांनी खळखळून हसवले. राज्यसभेवर निवडून आणल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे आभार मानताना आठवलेंनी केंद्रात मोदींचे, तर राज्यातही शिवशाहीचे सरकार आणण्याची घोषणा केली.
तोडून टाकतो मी काँग्रेसचे बंधन, महामानवांना करतो मी वंदन..
मैं शेर सुनाने नहीं, मैं राज्यसभा का शेर बनकर इचलकरंजी में आय हूं
असे सांगत आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ‘दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला भगव्यासोबत येण्याचे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही महायुतीत आलो,’ हे सांगतानाच आठवले म्हणाले....
भगव्यासोबत फडकू लागला निळा, काँग्रेसच्या पोटात उठला गोळा... तसेच
महायुती का पैगाम यहाँ लाया हूँ, मैं तो दलितोंका साया हूँ, उद्धव ठाकरे, मुंडेजी की माया हूँ...,
ही तर महायुतीची नांदी आहे, काँग्रेस, राष्‍ट्रवादी ही तुटणारी फांदी आहे
अशा एकापेक्षा एक सरस शीघ्र कवितांनी आठवले यांनी उपस्थितांना खळखळून हसवले. शरद पवारांवर आपले ‘प्रेम’ विशद करताना आठवले म्हणाले की, आता माझी व पवारांची राज्यसभेत भेट होणार आहे. तसेच पवारांचा माढा मतदारसंघ महायुतीत कोणाला सुटणार यावरून निर्माण झालेल्या वादावरही आठवलेंनी कविता पेश केली.
ज्यांना कुणाला घ्यायचं त्यांनी घ्या माढा,
पण पहिल्यांदा काँग्रेसवाल्यांना गाडा,
नाहीतर मीच करीन राडा....
आता महायुतीला राजू शेट्टी, महादेव जानकर आले आहेत. आता आम्हाला नव्या भिडूची गरज नाही, असा टोलाही आठवलेंनी मनसेचे नाव न घेता लगावला.
सभेला उपस्थित गर्दीचे कौतुक करताना ते म्हणाले,
बघा, बघा आहो आबा, ही बघा आमची महासभा


आज खासदार, उद्या मंत्रीही होईन
‘मी आता खासदार झालो आहे, उद्या मंत्रीही होईल..’ अशी भविष्यवाणीही आठवलेंनी केली. आम्ही पदांसाठी एकत्र आलो नाही. आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी, महाराष्‍ट्र टोलमुक्त करण्यासाठी व आघाडीला सत्तेवरून खेचण्यासाठी एकत्र आलो आहोत. कॉँग्रेसमुक्त महाराष्‍ट्र करायचा नाही. कारण इतके दिवस आम्ही विरोधी पक्षात होतो, आता त्यांना विरोधी पक्षात बसलेले, त्यांनी मोर्चे काढलेले पाहायचे आहे,’ अशी टोलेबाजीही आठवलेंनी केली.