आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिह्यातील शेतक-यांना दिलेल्या कर्जमाफीचे होणार फेरतपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - कर्जमाफीमध्ये घोटाळा झाल्याचे कॅगने स्पष्ट केल्यानंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील कर्जमाफीच्या अतिरिक्त उचलीचा विषय ऐरणीवर आला असून आता जिल्ह्यातील सर्वच शेतक-यांना दिलेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची फेरतपासणी होणार आहे. याआधीच्या तपासण्यांमधून 44 हजार शेतक-यांना 112 कोटी रुपयांची दिलेली कर्जमाफी अपात्र ठरवण्यात आली आहे.

2008 च्या कर्जमाफी योजनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 91 हजार 66 शेतक-यांना 280 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. दरम्यान, कागल तालुक्यातील अनेक शेतक-यांना दिलेली कर्जमाफी बेकायदेशीर असल्याने चौकशी करण्याची मागणी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केली होती. नाबार्डने तक्रारींची दखल घेत खास पथक पाठवून जिल्हा बँक आणि सेवा संस्थांच्या माध्यमातून दिलेले कर्ज आणि कर्जमाफीची तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये 46 कोटी रुपयांची कर्जमाफी अपात्र ठरवण्यात आली. तसेच जिल्हा बँक आणि सहकार विभागाने सविस्तर तपासणी करावी, असे आदेश नाबार्डने दिले होते. ही तपासणी केल्यानंतर आणखी 66 कोटी रुपयांची कर्जमाफी अपात्र ठरवण्यात आली. आतापर्यंत सुमारे 60 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशातच जिल्हा बँकेवर प्रशासक असल्याने नाबार्डच्या सूचनांनुसार कामकाज सुरू असल्याने कर्जमाफीनंतरची वसुली हा कळीचा मुद्दा बनला आहे.

या शेतक-यांकडून अशा पद्धतीने वसुली करता येणार नाही, असा दावा करत विविध पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून मंगळवारीच दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कर्जमाफी प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कर्जमाफी नको, परंतु तपासणी आवरा, असे म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

राजकीय संदर्भ
बोगस कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल तालुक्यातील शेतक-यांनी उचलल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. अशातच मुश्रीफ यांचे राजकीय विरोधक खासदार मंडलिक यांनी तक्रार केल्याने मंडलिक हे शेतक-यांच्या अन्नात विष कालवत असल्याचाही आरोप झाला; परंतु आपण सत्याच्या बाजूने असल्याचे स्पष्टीकरण मंडलिक देत आहेत. यातूनच आता सर्व प्रकरणांची फेरतपासणी होणार आहे.