आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार परत करणे हा यजमानांचा अपमान, अभिनेते विक्रम गोखले यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘तुमच्या कामाप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. ते परत करून ज्यांनी विचारपूर्वक हे पुरस्कार दिले आहेत अशा व्यक्ती आणि संस्थांचा अपमान करण्यासारखे असल्याने आपण कोणताही पुरस्कार परत करणार नाही. कारण तो माझ्या परिश्रमामुळे मिळवला आहे,’ अशी रोखठोक भूमिका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मंगळवारी मांडली.
असहिष्णुतेचे प्रमाण वाढल्याचा अाराेप करत सध्या देशभरात पुरस्कार वापसीची जणू लाटच उसळली अाहे. त्यात साहित्यिक, चित्रपट निर्माते- दिग्दर्शक, साहित्यिक व शास्त्रज्ञांचाही समावेश अाहे. या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारले असता गाेखले म्हणाले, ‘गेल्या ६७ वर्षांत अशा घटना भारतामध्ये घडल्या नाहीत का? ज्या तीन विचारवंतांची हत्या झाली त्या प्रकाराचा मी कडक शब्दांत निषेधच करतो. मग या वाढत्या असहिष्णुतेबद्दल मी काय करू शकतो, याचा विचार करून तशी कृती केली पाहिजे. मी लेखक असलो तर लेख लिहिले पाहिजेत. अभिनेता, दिग्दर्शक असेन तर तशी कलाकृती सादर केली पाहिजे. पुरस्कार परत करण्याने लगेच समाज सहिष्णू होता का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने गोखले यांनी आपल्या नाटकाचा प्रयोग थांबवला होता. या प्रकरणाची बरीच चर्चा झाल्यानंतर दहा कोटी रुपये खर्चून या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्याची पाहणी करून गोखले यांनी समाधान व्यक्त केले. २०१३ मध्ये पेण येथे आपण ‘पुन्हा नाटकात काम करणार नाही,’ अशी घोषणा केली होती; परंतु ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाची संहिता वाचल्यानंतर हा वेगळा विषय जनतेपर्यंत गेला पाहिजे म्हणूनच मी पुन्हा नाटकात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोखले यांनी सांगितले. दरम्यान, विष्णुदास भावे पुरस्कार मिळाल्याबद्दल गोखले यांचा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काेल्हापूर शाखेचे संचालक प्रफुल्ल महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मनोहर कुईंगडे, भालचंद्र कुलकर्णी चंदक्रांत जोशी, सीमा जोशी अादी उपस्थित होते.

‘एफटीअायअाय’प्रकरणी सरकारने हटवादी भूमिका साेडावी
‘एफटीआयअाय’ आंदोलनाबाबत गाेखले म्हणाले, ‘त्या विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत अशी माझी माहिती आहे. त्यांचा फक्त गजेंद्र चौहान एवढा एकच प्रश्न नाही. तिथली व्यवस्था सडली आहे असे त्यांचे मत आहे. त्यामुळे १४४ दिवसांपासून मुले संप करताहेत. तेव्हा केंद्र सरकारने याप्रकरणी हटवादी भूमिका घेऊ नये अशी आपली अपेक्षा अाहे. गजेंद्र चौहान हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांनीही याबाबत विचार करायला हवा. तसेच या संस्थेत १२ वर्षे एक विद्यार्थी राहतो कसा, याचीही चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणीही गाेखले यांनी केली.