आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक व्हायचे सोडून ‘सनातन’ मार्गावर रुद्र, मडगाव स्फोटात फरारी, पानसरे हत्येचाही संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा वर्षांपूर्वी गोव्यातील मडगावात झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागाचा आरोप असलेला सांगलीतील रुद्रगौडा पाटील याच्यावर आता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही संशयाची सुई आहे. विशेष म्हणजे केवळ रुद्र गौडाच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंबच सनातन संस्थेशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. कोण आहे हा रुद्रगौड...
सांगली- गोव्यातील मडगाव येथे २००९ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ठार झालेला मलगोंडा पाटील हा रुद्रचा चुलत भाऊ. दहावीपर्यंत शाळेत शांत आणि बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी म्हणून अाेळखला जाणारा रुद्र डी.एड. करण्यासाठी मिरजेत आला. तेथेच तो सनातन संस्थेशी जोडला गेला. डी.एड. पूर्ण झाल्यानंतर शिक्षकी नोकरी करण्यापेक्षा रुद्रने सनातन संस्थेचे पूर्णवेळ काम करणे पसंत केले. रुद्रचे एक चुलतेदेखील याच काळात सनातन संस्थेचे पूर्णवेळ काम पाहत होते. जत तालुक्यामध्ये त्यांनी सनातनच्या प्रचाराचे काम केले.
रुद्रचा चुलत भाऊ मलगोंडा हा सनातन संस्थेचे मुखपत्र असलेल्या "सनातन प्रभात' या दैनिकाचा बातमीदार म्हणून सांगली, मिरजेत काम करत होता. गोवा बॉम्बस्फोटापुर्वी काही वर्षे रुद्र आणि मलगोंडा दोघेही तिकडे गेले हाेते. तेथील बॉम्बस्फोटात सनातन संस्थेच्या सहभागाचे आरोप झाल्यानंतर जत तालुक्यातील सनातन संस्थेशी जोडल्या गेलेल्या पाटील कुटुंबाप्रमाणे अन्य कुटुंबांनाही धक्का बसला. या स्फोटात मलगोंडा ठार झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला रुद्र याचाही या कटात सहभाग असल्याचा संशय बळावला आणि त्यांनी रुद्रचा शोध सुरू केला. तेव्हापासून रुद्र फरार असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला ‘वाँटेड’ घोषित केले आहे. त्यांच्या वेबसाइटवरच जाहीर केले आहे.
पत्नीने घेतले समीरचे वकीलपत्र
मलगोंडाच्या निधनानंतर रुद्र एकदाच जतमध्ये सनातन संस्थेच्या एका कार्यक्रमात सार्वजनिकरीत्या दिसला. तेव्हापासून तो फरारीच आहे. दरम्यानच्या काळात त्याचा विवाह झाला. त्याची पत्नी प्रीती पाटील व्यवसायाने वकील असून ती आजही मिरजेत राहते. तीही सनातनची साधक असून पानसरे हत्या प्रकरणात नुकताच अटक करण्यात आलेला संशयित आरोपी समीर गायकवाडचे वकीलपत्रही तिने घेतले आहे.

कुटुंबीय दूरच रुद्रचे कुटुंब काराजनगी (ता. जत) या गावात लोकवस्तीपासून दूर शेतात राहते. तेथे मलगोंडाचा भाऊ, आई-वडील, रुद्रचे आई-वडील शेती करतात. मलगोंडाच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचे गावातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे बंद झाले. क्वचितच ते गावात येतात.

काँग्रेसचा कट; काकाचा आरोप
रुद्रच्या कुटुंबाची शंभर एकर जमीन असल्याचे सांगितले जाते. मलगोंडाच्या निधनाबद्दल रुद्रच्या काकांना हा काँग्रेस सरकारने केलेला कट असल्याचे वाटते. ‘मलगोंडाचा गोव्यातील स्फोटाशी काहीही संबंध नव्हता. काँग्रेस सरकारने त्याला त्यात गोवले आहे,’ असे ते म्हणाले. मात्र या स्फोटापूर्वी दिवाळीत मलगोंडाने त्याच्या शेतात स्फोटाची चाचणी केली होती, असे गावातील लोक सांगतात.

मुख्यमंत्र्यांची भूमिकाच संशयास्पद : कोळसे
तब्येत उत्तम असताना कॉ. गोविंद पानसरे यांना अचानक कोल्हापूरहून मुंबईला आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच या हत्या प्रकरणात पोलिस आधीच समीर गायकवाडपर्यंत पोहोचले असताना त्यांना पुन्हा दुसऱ्या शक्यतांच्या आधारेही तपास करायला सांगितले. या दाेन्ही बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप निवृत्त पोलिस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
‘हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत पानसरे हे राज्यभर रान उठवणार होते. त्यामुळेच पानसरेंवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यातही ते वाचले. पानसरे जर पुन्हा फिरायला लागले तर सर्व प्रकरणे उघडकीस येतील म्हणूनच जखमी अवस्थेत त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्याचा कट मुख्यमंत्र्यांनी रचला,’ असा खळबळजनक आरोप या वेळी कोळसे व मुश्रीफ या दाेघांनी केला.

बंदीचा मुद्दा : शिवसेना-भाजपमध्ये दुही
सनातन संस्थेवर बंदीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी आग्रही मागणी करत असताना सत्ताधारी शिवसेना व भाजपात मात्र या मुद्द्यावर विभिन्न मते दिसून आली. ‘पानसरे, दाभोलकरांचे मारेकरी पकडले जायलाच हवेत. मात्र काही ढोंगी पुरोगाम्यांना खुश करण्यासाठी काेणीही हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याची सुपारी घेऊ नये,’ असे आपल्या मुखपत्रात सुनावत शिवसेनेने ‘सनातन’वर बंदीची मागणी करणाऱ्यांना फटकारले आहे. दुसरीकडे, भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने मात्र, ‘जर पानसरेंच्या हत्येत सनातनचा सहभाग स्पष्ट झाला तर या संघटनेवर बंदी घालण्यास सरकारला काहीच अडचण नाही,’ असे स्पष्ट केले.
दरम्यान, सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव काँग्रेस-राष्ट्रवादीने २०११ मध्येच यूपीए सरकारकडे पाठवला होता. पण त्यावेळी केंद्रात गृहसचिव म्हणून काम करणाऱ्या संघ विचारसरणीच्या आर.के. सिंह यांच्यासारख्या लोकांमुळेच या संघटनेवर बंदी येऊ शकली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला अाहे.