आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगली - हा जमाना ‘मिलीजुली’ सरकारांचा आहे. केंद्रात यापुढे कोणा एका पक्षाचे सरकार सत्तेत येणे अशक्य आहे. त्यामुळे समविचारी पक्षांनी निवडणुकीआधीच एकत्र येऊन आपला अजेंडा ठरवावा, त्यात शेतकरी केंद्रस्थानी असावा, असे मत व्यक्त करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी रविवारी पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आयोजित सभेत मुलायमसिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर. पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील
उपस्थित होते.
मुलायम म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचे तीनवेळा नेतृत्व केले. मात्र, देश आणि राज्यांच्या प्रगतीसाठी महिला आणि तरुणांचा सहभागही महत्त्वाचा आहे. तुम्ही तरुणांना आत्ताच सत्तेत घेतले नाही तर पक्ष संपून जातील. म्हणूनच तरूणांच्या हाती राज्याची सूत्रे देण्याचा निर्णय घेवून समाजवादी पक्षाने अखिलेशला मुख्यमंत्री केल्याचे
त्यांनी स्पष्ट केले.
स्मारकासाठी सहकार्य : मुख्यमंत्री
नागनाथअण्णा हे एक विचार होते. त्यांचे विचार पुढील पिढीला प्रेरक ठरतील, असे स्मारक उभा राहावे. त्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिली. वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यात सहवीज प्रकल्प आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते.
लढाई संपलेली नाही : कुसुमताई
दुष्काळग्रस्तांना टँकर, चारा देऊन दात टोकरून पोट भरण्याचा सरकारचा उद्योग आहे. अण्णांनी दुष्काळग्रस्तांना कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी लढा उभारला. तो अद्याप अपुरा आहे. सरकारने दुष्काळग्रस्तांना पाणी द्यावे, हीच अण्णांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना नागनाथअण्णांच्या पत्नी कुसुमताई यांनी व्यक्त केल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.