सातारा - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या वेळी तथाकथित बुवा-बाबा , साधू, महंत यांना श्रद्धेच्या नावाखाली बोलावून अनिष्ट पायंडा पाडल्याचा आक्षेप नोंदवत परिवर्तनवादी संघटनेने या प्रकाराचा निषेध केला. परिवर्तनवादी संघटनेच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चेनंतर निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
ज्या बाबाने ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती, ज्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लढा दिला होता, त्यांना सरकारी शपथ सोहळ्यास मान्यवर म्हणून बोलावणा-या सरकारचा या बैठकीत निषेध नोंदवण्यात आला. निषेधाचा ठराव दिनकर झिंबरे यांनी मांडला व विजय मांडके यांनी त्याला अनुमोदन दिले. या ठरावाची प्रत तातडीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचेही या वेळी ठरवण्यात आले. या वेळी परिवर्तनवादी संघटनेचे पदाधिकारी तसेच अंनिसचे उदय चव्हाण उपस्थित होते.