आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत मुलांनी तयार केले स्वस्त सौर दिवे, बाजारातील दिव्यांच्या २५ % कमी खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - प्रोत्साहन दिले की मुलेही नवनिर्मितीचा ध्यास घेतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सांगली जिल्ह्यातील खंडेराजुरी येथील रॉयल अकॅडमी या निवासी शाळेतही नुकताच याचा प्रत्यय आला. शाळेच्या आवारात बसवलेल्या सौर पथदिव्यांपासून प्रेरणा घेत येथील मुलांनी बाजारातील दिव्यांच्या २५ टक्के किमतीत त्याच क्षमतेचे पथदिवे तयार केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेली रॉयल अकॅडमी ही पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणारी निवासी शाळा. शाळेचे संस्थापक शहाजी शिंदे यांनी मुलांच्या वसतिगृहाच्या परिसरात बाजारातील तयार सौर पथदिवा आणून बसवला. १६ हजार रुपये किमतीचा हा पथदिवा पुरेसा प्रकाश देत नव्हता. मग अवधूत मोहिते, प्रमोद माने, आदित्य जिवाजे, वृषभ नरळे, अजय गडगे, प्रशांत साळुंखे, पवन भोसले या विद्यार्थ्यांनी आपण स्वत:च केवळ चार हजार रुपयांत सौरपथदिवा बनवू, असा विश्वास संस्थापक शिंदे यांना दिला. त्यांनीही प्रोत्साहन देत सौरदिवा तयार करण्यासाठी मुलांना पैसे व आवश्यक साधने उपलब्ध करून दिली. मुलांनी सौरदिवे तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग कुठे मिळतात, याची माहिती इंटरनेटवरून मिळवली. ते जोडण्याचे तंत्र शिक्षक आणि पुस्तकांच्या आधारे अवगत केले आणि केवळ चार हजार रुपयांत पथदिवा तयार झाला. एका टीमने तयार केलेला हा दिवा पाहून मुलांच्या दुस-या टीमने साडे तीनहजार रुपयांत त्याच क्षमतेचा सौरदिवा तयार करण्याचे आव्हान घेतले आणि मनोज सावंत, अक्षय जाधव, वैभव पन्हाळकर, हर्षल मराठे या मुलांच्या टीमने ते यशस्वी करून दाखवले. सध्या शाळेच्या आवारात मुलांनी बसवलेले पाच ते सहा सौर पथदिवे प्रकाश देत आहेत.

शाळेच्या विजेची गरज सौरऊर्जेतून भागवणार
ग्रामीण भागात असलेल्या या शाळेला वारंवारच्या भारनियमनाला सामोरे जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी निवासी विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोच शिवाय शाळेच्या प्रशासकीय कामकाजातही अडथळे येतात. म्हणून शाळेसाठी लागणारी विजेची संपूर्ण गरज सौरऊर्जेतून पूर्ण करून विजेच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण होणार आहोत, असे शहाजी शिंदे यांनी सांगितले.