आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: ‘सांगली चांगली’ करण्यासाठी ‘सजग’तेचे पाऊल; विकास आरखडा तयार करण्यास सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगलीतील प्रसिद्ध गणेश मंदिर - Divya Marathi
सांगलीतील प्रसिद्ध गणेश मंदिर
सांगली - सांगली शहर आणखी चांगले करण्यासाठी शहरातील सजग नागरिक सरसावले आहेत. शहराच्या विविध क्षेत्रांतील नागरिकांनी एकत्र येऊन सजग सांगलीकर फोरमची स्थापना केली असून २०२५ मधील शहर डोळ्यासमोर ठेवून विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी त्याची सुरुवात झाली.
आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, अभियंता माधव कुलकर्णी, डॉ. मनोज पाटील, पत्रकार जयसिंग कुंभार, शशिकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, आशिष कोरी, प्रा. आर. बी. शिंदे यांच्यासह आणखी काही सजग नागरिकांनी शहराच्या विकासासाठी चार महिन्यांपासून मोट बांधण्यास सुरुवात केली. शहराचा विकास आराखडा त्या त्या भागातील नागरिकांच्या गरजा आणि सूचनांशिवाय पूर्ण होऊ शहत नाही, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी भागाभागातील लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आणि रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या सुविधांमधील तज्ज्ञांना यात सहभागी करून घेण्यासाठी रविवारी रोटरी हॉलमध्ये ‘चांगली सांगली’ची संकल्पना मांडली.

माधव कुलकर्णी यांनी या योजनेचा प्राथमिक उद्देश स्पष्ट केला, तर प्रमोद चौगुले यांनी विकास आराखडा कसा असू शकतो याची रूपरेखा मांडली. सांगली शहराचा यापूर्वी १९८० मध्ये सन २००० पर्यंतचा विकास आराखडा मांडला गेला, मात्र त्याची गेल्या ३५ वर्षांत केवळ ८ टक्के अंमलबजावणी झाली आहे. नवा आराखडा हा लोकांच्या गरजांतूनच तयार व्हावा या हेतूने हा फोरम स्थापन करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील लोकांच्या गरजा काय, शहराचे सार्वत्रिक प्रश्न काय, हे जाणून घेऊन विकासाचे धोरण तयार करणे, त्यानुसार उद्दिष्ट निश्चित करून सकल विकास आराखडा तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यामध्ये या फोरमचा सहभाग असेल.

पर्यटनाला चालना देणार
‘सांगली शहराच्या आणि एकूणच महापालिका क्षेत्राच्या ६६ टक्के विकासासाठी संधी आहेत. आपल्याकडे बेदाणा, द्राक्षे, डाळिंब, हळद, ऊस, भाजीपाला या शेती उत्पादनांची मुबलकता आहे. मेडिकल, अॅग्रो टुरिझमच्या संधी आहेत. बुद्धिबळ, कुस्ती, कबड्डी अशा क्रीडा प्रकारांत विकासाच्या संधी आहेत. आपल्याला सांस्कृतिक, प्राचीन वारसा आहे. त्याचे मार्केटिंग करून आपण पर्यटनाला चालना देऊन शहराच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी शहराचा सूत्रबद्ध विकास होणे गरजेचे आहे आणि हा विकास लोकांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे,’ असे चाैगुले म्हणाले.
स्वतंत्र वेबसाइट
या फोरमने ‘सजग सांगली डॉट ओआरजी’ ही अशी वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून विविध भागांतील लोकविकास आराखड्याबाबतच्या आपल्या सूचना, गरजा मांडू शकतात. या सूचनांवर प्रत्येक १५ दिवसांनी एकत्रित बसून चर्चा केली जाईल आणि त्यातून अंतिम विकास आराखडा तयार केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...