आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangali Municipal Corporation Election Voting 63 %

सांगली महापालिका निवडणूकीत 37 प्रभागांत 63 % मतदान, मात्र कॉंग्रेस उमेदवाराचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - मतदानाच्या दिवशीच काँग्रेसचे उमेदवार श्यामराव मुळके यांचे निधन झाल्याने सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या प्रभाग 22 मधील निवडणूक रविवारी रद्द करण्यात आली. मुळके यांच्या निधनानंतरही मतदान प्रक्रिया काही काळ सुरूच राहिल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रावर दगडफेक केली, त्याला राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही गटांत जोरदार धुमश्चक्री उडाली. दरम्यान, महापालिकेच्या उर्वरित 37 प्रभागांतील 76 जागांसाठी सरासरी 63 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी होणार आहे.


रविवारी सकाळी मनपाच्या 78 जागांसाठी 494 केंद्रांवर मतदान सुरू झाले. प्रभाग 22 मधील काँग्रेसचे उमेदवार श्यामराव मुळके यांची प्रकृती शनिवारीच बिघडली होती. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उमेदवाराच्या निधनानंतर प्रभागातील मतदान थांबवणे अपेक्षित होते. मात्र, सकाळी साडेसातला मतदान सुरू झाले. त्यामुळे संतप्त काँग्र्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका केंद्रावर दगडफेक करत मतदान बंद पाडले. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आयोगाकडून अभिप्राय मागवून मतदान प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस गटाच्या दिशेने दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.


निवडणूक आयोगाचे दोन्ही प्रयोग अयशस्वी
सांगली महापालिकेच्या निमित्ताने निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी रोल मॉडेल म्हणून दोन प्रयोग करण्याची घोषणा केली होती. पहिला प्रयोग पोलिस व मतदान कक्षात कर्तव्यावर असणा-या कर्मचा-यांसाठी ई-व्होटिंगचा होता. मात्र, विधी विभागाने अडचणी समोर आणल्याने तो रद्द झाला. दुसरा प्रयोग मतदानादिवशीच प्रभाग क्रमांक 22 मधील मतमोजणी करण्याचे नियोजन होते. त्यासाठीची तयारीही करण्यात आली होती. मात्र, याच प्रभागातील काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने येथील निवडणूक रद्द झाली अन् हा प्रयोगही होऊ शकला नाही.