आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangli Municipal Corporation Mayer Indris Nayanvadi Issue

सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडींची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा एकमुखी ठराव शनिवारी जिल्हा कार्यकारिणीने घेतला. इद्रिस यांचे वडील आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य इलियास नायकवडी यांचीही हकालपट्टी करावी, या मागणीचा ठराव प्रदेशाध्यक्षांना पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
सांगली महापालिकेत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीची सत्ता आहे. नायकवडी यांना एक वर्षासाठी महापौरपद देण्यात आले होते; मात्र त्यांनी मुदत पूर्ण झाल्यावर राजीनामा देण्यास नकार देत पाटील यांच्याविरोधात बंड पुकारले होते.
महाआघाडीतील घटकपक्ष भाजप आणि काँग्रेसच्या मदतीने त्यांनी पाटील गटाविरोधात शह-काटशहाचे राजकारण सुरू केले होते. यावरून वर्षभरापासून नायकवडी आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यामुळे नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती.

शाही विवाहाचे निमित्त
नायकवडी यांच्या मुलाचा नुकताच शाही विवाह झाला. दुष्काळी परिस्थितीत महापौरांनी कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याने त्यांच्यावर टीका झाली. हेच कारण पुढे करून नायकवडीविरोधी गटाने पुन्हा त्यांच्या हकालपट्टीसाठी प्रयत्न सुरू केले होते. जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी याबाबत प्रदेश कार्यकारिणीला कळवले होते; मात्र प्रदेश कार्यकारिणीने याबाबत जिल्हा पातळीवरच निर्णय घ्या, असा सल्ला दिला होता. त्यानुसार शनिवारी जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात निर्णय घेण्यात आला.

जयंत पाटलांची ‘न्यू क्रिमिनल पार्टी’
हकालपट्टीचा निर्णय कळताच महापौर इद्रिस नायकवडी यांनीही पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ‘शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून मी महापालिका क्षेत्रात प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी काम केले. मात्र, आता राष्टÑवादी हा शरद पवार यांचा पक्ष राहिलेला नाही. जयंत पाटील यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन न्यू क्रिमिनल पक्ष स्थापन केला आहे. याचा परिणाम भविष्यात त्यांनाच भोगावा लागेल.’