आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नद्या वळवून फार्महाऊस बांधले नाही : प्रतीक पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - वनमंत्री पतंगराव कदम यांनी जमिनी घेऊन शैक्षणिक संस्था उभारल्या; तुमच्यासारख्या नद्या वळवून फार्महाऊस बांधले नाहीत, असा टोला केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रतीक पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी पवारांच्या टीकेचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला ते म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या नेत्यांनीही सांगलीत प्रचार सभा घेतल्या; मात्र आम्ही विकासाच्या मुद्यावर बोललो. कोणावर खालच्या स्तरावर जावून टीका केली नाही. महाआघाडीचा निष्क्रियपणा जनतेपुढे उघड केला. त्यांनी मात्र पातळी सोडून टीका केली.

पतंगराव कदम यांनी किती जमिनी बळकावल्या, याची अंडीपिल्ली बाहेर काढल्यास अवघड जाईल, असे अजित पवार यांनी काल वक्तव्य केले होते. यावर पाटील म्हणाले, ‘‘पतंगराव कदम यांनी शैक्षणिक संस्था उभारणीसारख्या पवित्र कामासाठी जमिनी घेतल्या. तुम्ही काय केले? पत्नीला फार्महाऊस बांधून देण्यासाठी नदीचा प्रवाहच बदलला. आमच्याकडेही बोलण्यासारखे खूप काही आहे. मात्र, आम्ही बोलणार नाही, कारण ते आमच्या संस्कारात नाही.’’

काय म्हणाले होते अजितदादा पवार
आम्ही काम करतो. दुसर्‍यांची वाभाडी काढत नाही. कोणी किती जमिनी लाटल्या, काय काय धंदे केले, हे आम्हालाही माहीत आहे. आम्ही टीका करायला लागलो तर तुमचीही अंडीपिल्ली बाहेर काढू. पतंगराव कदम सांगताहेत, ‘आम्ही सांगलीला आणखी एक मोठं पद आणलंय.’ अहो, पतंगराव, तुम्हाला हवं ते पद मिळत नाही आणि दुसर्‍याला काय पदे वाटता.’ अशी टीका त्यांनी प्रचारसभेदरम्यान केली होती.

हे म्हणाले प्रतीक पाटील
माणिकराव ठाकरे हे चारदा विधानसभेवर निवडून गेले, हे अजित पवार विसरले आहेत. मुख्यमंत्री विधान परिषदेवर निवडून गेले असले तरी ती घटनात्मक तरतूद असते. उद्या शरद पवारही राज्यसभा लढवणार आहेत. मग त्यांना जनाधार नाही, असे आम्ही म्हटले तर चालेल का?’’ तुम्ही काय केले? पत्नीला फार्महाऊस बांधून देण्यासाठी नदीचा प्रवाहच बदलला. आमच्याकडेही बोलण्यासारखे खूप आहे. मात्र, आम्ही बोलणार नाही.