आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजयकाकांमुळे काँग्रेसचीही वाट बिकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीसह काँग्रेससमोरही मोठे आव्हान निर्माण केले आहे. पाटील लोकसभेला उभे राहिल्यास कॉँग्रेसचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यासाठी निवडणूक अवघड जाण्याची चिन्हे आहेत, तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

संजय पाटील हे राष्ट्रवादीत असूनही आर. आर. पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी. 2009 पर्यंत ते कॉँग्रेसमध्ये होते. त्या वेळची निवडणूक आबांना जड जात असल्याचे पाहून शरद पवारांच्या आदेशाने व जयंत पाटलांनी संजयकाकांना राष्ट्रवादीत आणून आबांचा मार्ग सुकर करण्यात आला. त्या बदल्यात काकांना विधान परिषदेवर घेण्यात आले. मात्र, आबा व काका एकाच पक्षात आल्याने तासगावात विरोधक संपल्याची राष्ट्रवादीची भावना झाली. मात्र, त्यांच्यात कधीच दिलजमाई झाली नाही. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत सतत कुरबुरी होत राहिल्या. तासगाव नगरपालिकेची निवडणूक लागताच आबा-काका गटात भडका उडाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत आबांविरोधात लढवण्यासाठी राष्ट्रवादीतील आणखी एक नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यांना संजय पाटील यांची साथ मिळू शकेल.

प्रतीक पाटील यांची वाट बिकट
सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांमध्ये संजय पाटलांना मदत करणारी कार्यकर्त्यांनी मोठी फौज आहे. शिवाय मोदींचे वारे, भाजपची व्होट बँक, या सार्‍याचा फायदा संजय पाटील यांना मिळू शकतो. त्यामुळे या वेळची लोकसभा निवडणूक प्रतीक पाटलांना कठीण असणार, हे निश्चित.