आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय मंडलिक शिवसेनेत;महाडिक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोल्हापुरातील अपक्ष खासदार व कॉँग्रेसचे सहयोगी सदस्य सदाशिव मंडलिक यांचा मुलगा प्रा. संजय मंडलिक यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेल्या संजय यांना कोल्हापुरातून शिवसेनेची उमदेवारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच संजय मंडलिक यांनी मातोश्री येथे शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे मंडलिक यांचा शिवसेना प्रवेश निश्चित होताच. शिवसेनेने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती परंतु त्यात कोल्हापूरसाठी उमेदवार दिला नव्हता. शनिवारी संजय मंडलिक यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या वेळी मंडलिक यांचे स्नेही व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही उपस्थित होते. गतवेळचे पराभूत उमेदवार युवराज संभाजीराजे यांनाही शिवसेनेने गळ घातली होती, मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यासच नकार दिल्याने अखेर शिवसेनेने मंडलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

शिवसेनेने निष्ठावंतांना डावलले
जिल्ह्यातील निष्ठावंतालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी कोल्हापूरातील शिवसैनिक पक्षश्रेष्ठींकडे करत होते. मात्र एकाही नेत्यात निवडून येण्याची क्षमता नसल्याची खात्री असल्याने उद्धव यांनी मंडलिक यांना जवळ केल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीत येण्यापूर्वी सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसमध्ये जाण्याबाबत विचार केला होता. परंतु आघाडीत कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने मंडलिकांना तिकीट मिळणे कठीण झाले होते.

निवडणुकीसाठी तडजोड
मागील निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करत त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला होता. तेव्हापासून मंडलिक शरद पवारांवर जाहीर टीका करत असत. गेली पाच वर्षे कॉँग्रेसशी संलग्न राहिलेल्या व जातीयवाद्यांशी कधीही हात मिळवणी करणार नसल्याच्या घोषणा करणार्‍या मंडलिक यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींच्या मध्यस्थीने संजयला शिवसेनेनत आणले आहे. दरम्यान, कोल्हापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाडिक व मंडलिक यांच्यात चुरशीचा सामना होण्याची चिन्हे आहेत.

सतेज पाटील यांची कोंडी
कोल्हापूर गेल्या तीन वर्षांच्या राजकारणात कॉँग्रेसचे नेते, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना बळ दिले. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवले. जेव्हा आमदार महादेवराव महाडिक यांच्या चिरंजीवासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरले असताना सतेज पाटील यांच्या पाठबळामुळे संजय मंडलिकांनी राजीनामा दिला नव्हता. ज्यांच्यासाठी सतेज पाटील यांनी आपले बळ खर्च केले ते मंडलिक आता शिवसेनेत गेल्याने सतेज पाटील यांची कोंडी झाली आहे.