आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjaykaka Patil News In Marathi, Lok Sabha Election, Pratik Patil

संजयकाकांमुळे सांगलीत प्रथमच चुरस, प्रतीक पाटील यांना द्यावी लागणार कडवी झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात या वेळी पहिल्यांदाच चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार संजयकाका पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने केंद्रीय कोळसा राज्यमंत्री व कॉँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रतीक पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.


दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीचा एकमेव अपवाद वगळता सांगली लोकसभा मतदारसंघावर आजवर काँग्रेसचेच प्राबल्य राहिले आहे. त्यातही माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याकडेच हा मतदारसंघ सर्वाधिक काळ राहिला. वसंतदादांचे पुत्र व प्रतीक पाटील यांचे वडील प्रकाशबापू पाटील यांनी येथून पाचवेळा निवडणूक जिंकली, तर दादांचेच पुतणे माजी मंत्री मदन पाटील दोनवेळा निवडून गेले होते. प्रकाशबापू पाटील यांच्या निधनानंतर गेली सात वर्षे प्रतीक पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वसंतदादा पाटील यांच्यानंतर त्यांच्या घराण्याचे वर्चस्व कमी करण्यासाठी जिल्हय़ातील राजारामबापू पाटील यांचा गट सक्रिय झालेला आहे. त्यातूनच सुरुवातीला प्रकाशबापू पाटील यांच्या पराभवासाठी आणि आता प्रतीक पाटील यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी कधी भाजपला तर कधी अपक्षांना ताकद दिली. मात्र दादांच्या नावाचा महिमा अजूनही ओसरलेला नसल्यामुळे त्यांच्या वारसांना पराभूत करण्यात या मंडळींना आजवर यश आले नाही. असे असले तरी गत निवडणुकीत प्रतीक पाटील यांचे मताधिक्य घटले होते, हे उल्लेखनीय. काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्यांना झुंजवले होते.


कॉँग्रेस- भाजपमध्येच लढत
या वेळी सक्षम उमेदवाराअभावी प्रतीक यांना निवडणूक सोपी जाणार, अशी चर्चा असतानाच भाजपने राष्ट्रवादीतील बडे नेते संजयकाका पाटील यांना पक्षात खेचून उमेदवारीही दिली. त्यामुळे पुन्हा वसंतदादा घराणे विरुद्ध विरोधक हा सामना या वेळीही पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार अँड. समिना खान या नवख्या असल्याने त्यांचा प्रभाव कितपत पडेल, हा प्रo्न आहे. त्यामुळे खरी लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.


संभाजी पवारांचा खोडा
सांगलीतील भाजपचे आमदार संभाजी पवार या वेळी लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांना स्वत:साठी किंवा मुलासाठी उमेदवारी हवी होती. मात्र पक्षनेतृत्वाने बाहेरचा उमेदवार लादल्याने आपण आता प्रचाराला बाहेर पडणार नाही, अशी टोकाची भूमिका पवार यांनी घेतली आहे. पवार यांचा व्यक्तिगत प्रभाव र्मयादित स्वरूपाचा असल्याने संजयकाकांना फारसा फरक पडणार नसला तरी त्यांच्या उपद्रवी मूल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना पवार यांची सर्वप्रथम समजूत काढावी लागेल.


संजय पाटील यांची बलस्थाने
* नरेंद्र मोदी यांच्या नावाचा महिमा
* दादा घराण्याच्या सर्व विरोधकांचे छुपे पाठबळ
* आक्रमकपणे प्रचार करण्याची क्षमता
* तरुण कार्यकर्त्यांचे मतदारसंघातील नेटवर्क
* विद्यमान खासदाराचा कमी जनसंपर्क

प्रतीक पाटील यांची बलस्थाने
* वसंतदादा घराण्याचा लोकांवरील पगडा
* विरोधी उमेदवाराच्या तुलनेत स्वच्छ प्रतिमा
* विरोधी उमेदवाराची विश्वासार्हता कमी
* भाजपमधील अंतर्गत संघर्ष
* कृष्णा खोरे सिंचन योजनांसाठी केंद्रातून निधी मिळवला

उणिवा
* हरवलेली राजकीय विश्वासार्हता
* गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांवर भिस्त
* राष्ट्रीय राजकारणात कामाचा कमी अनुभव
* भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी