आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे नीरा स्नान, तुकोबांची पालखी बारामतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले वारकरी अशा भक्तिपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. लोणंद येथील नीरा नदीच्या पात्रात वारकर्‍यांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. मात्र, पावसाने ओढ दिल्याने या सोहळ्यासाठी यंदा वारकर्‍यांच्या संख्येत घट झालेली दिसून आली.

सातारा जिल्ह्यात यंदा सात दिवस माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. लोणंद येथे दोन दिवस मुक्काम असून पुढे सोहळा फलटणकडे मार्गस्थ होईल. शुक्रवारी जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शशिकांत शिंदे, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आदींनी पालखीचे स्वागत केले.
शासनाच्या वतीने वारकरी मंडळींसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, वीज- रॉकेलची सोय आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
सातारा जिल्हयात माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण 29 रोजी चांदोबाचा लिंब येथे होणार आहे. तर 30 जून व 1 जूलै रोजी मुक्काम फलटण येथेच आहे. 2 जुलै रोजी पालखी बरड येथे पोचणार आहे तर 3 जुलै रोजी प्रस्थान करून साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा व धर्मपूरी येथे दुपारचे भोजन होईल. त्यानंतर शिंगणापूर फाटा (पानसकरवाडी ) येथे दुपारचे भोजन घेतल्यावर पालखी नातेपुते (जि.सोलापूर) येथे पोचेल.
तुकोबांची पालखी बारामतीत दाखल
बारामती - संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी बारामतीत दाखल झाला. नगराध्यक्षा जयश्री सातव व बारामतीकरांनीही उत्स्फूर्त स्वागत केले. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली. पावसाअभावी पालखीत वारकर्‍यांची घटली आहे.

छायाचित्र : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. लोणंदच्या नीरा नदीत माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.