आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवल्याने कोल्हापूरात पुन्हा टोल, आंदोलन पेटणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूरामधील टोल वसुलीला दिलेली तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने आज उठवल्याने शहरात पुन्हा टोल वसुली सुरु होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत मुंबई हायकोर्टाने 31 जुलै रोजी सुनावणी घेऊन अंतिम निर्णय द्यावा, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मात्र, सध्या असलेली स्थगिती उठवल्याने 31 जुलैपर्यंत टोल वसुली करण्याचा आयआरबीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. दरम्यान, कोल्हापूरकरांनी या निर्णयानंतर आक्रमक भूमिका घेत टोल कोणत्याही भरला जाणार नाही अशी ताठर भूमिका घेतली आहे.
कोल्हापूर टोलविरोधी कृती समितीने रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने टोल वसुली करू नये अशी याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाने टोल वसुली करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच याबाबत पुढील सुनावणी 31 जुलैला होईल असे सांगितले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने टोल वसुलीला असलेली तात्पुरती स्थगिती उठवली आहे. कोल्हापूरात आयआरबी कंपनीने रस्ते विकास प्रकल्पांतर्गत समुारे 50 कि.मी. अंतराच्या रस्त्यांचे काम बीओटी तत्त्वावर केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने केलेल्या करारानुसार आयआरबी कंपनीला पुढील 30 वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य शहरात टोल वसुली करू देणार नाही अशी भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली. यातूनच तीव्र जनआंदोलन पेटले व टोलविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. आता या समितीने पुन्हा टोल वसुलीला तीव्र विरोध केला आहे. टोल सुरु झाला तर पुन्हा जोरदार आंदोलन करू असे समितीने म्हटले आहे. यामुळे राज्य सरकार, आयआरबी आणि कोल्हापूरकरांत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.