आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Children Planted Education Teacher Activities In Sangli

शाळाबाह्य मुलांना लावली शिक्षणाची गाेडी, सांगली जिल्ह्यातील शिक्षिकेचा अादर्श उपक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली; उपनगरातील शाळा; पण ५० टक्के विद्यार्थी शाळाबाह्य तर उरलेले झोपडपट्टीतील. घरच्यांची गैरसोय असेल तेव्हा शाळा. शाळेत आल्यावरही हाताला लागेल ते ‘ढापायचे’, अशी काही मुलांची गत; मात्र ही स्थिती बदलण्यासाठी स्रेहा मगदूम या शिक्षिकेने पदरमाेड करून काम सुरू केले. अाज हीच मुले या शाळेची ‘अॅम्बेसेडर’ बनली आहेत.

सांगलीतील वान्लेसवाडी परिसरातील शाळा चार वर्षांपूर्वीपर्यंत अडगळीत होती. वर्गाच चारच मुले; पण पटावर ४०, अशी स्थिती होती. जवळच सुरू असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामावर असलेल्या कामगारांच्या मुलांची नावे पटावर; पण ही मुले शाळेत नसायची. मगदूम मॅडमनी पालकांना भेटून मुलांना या शाळेत पाठवण्यासाठी आग्रह धरला. मग पालकांनीही काहीशा अनुत्साहानेच मुलांना शाळेत पाठवले. यातील प्रणव खामकर या विद्यार्थ्याने पहिल्याच दिवशी वर्गातील लिहायच्या पाच पाट्या घरी नेल्या.

मगदूम यांना ही गोष्ट कळाली. त्यांनी प्रणवचे घर गाठले, तर त्याची आई म्हणाली, ‘मी त्याला सांगत होते, आपल्याला याचा काय उपयोग म्हणून.’ अशी स्थिती. मॅडमनी दुसऱ्या दिवशी प्रणवला ही शाळा, इथली मुलं, शिक्षक हेदेखील आपल्या कुटुंबाचाच भाग आहेत, हा विश्वास दिला. त्यानंतर प्रणव शाळेचा अाधारच बनला. शाळेतील एकही वस्तू इकडची तिकडे होत नसे. अशा अनेक ‘प्रणव’ना मॅडमनी बदलले. शिक्षणाविषयी त्यांच्यात गोडी निर्माण केली. आज शाळेत येणाऱ्या कोणाही पाहुण्यांना हीच मुले शाळेविषयी अभिमानाने माहिती देतात.

मगदूम मॅडमना शिक्षा म्हणून या शाळेत पाठवले हाेते. त्यांच्या वाट्याला सुरुवातीला उपेक्षाच आली. त्या येण्यापूर्वी शाळेची स्थिती अत्यंत वाईट होती. सर्वत्र गवत वाढले होते, त्यात साप फिरायचे. रंगरंगोटी नव्हती. शाळा समितीच्या सदस्यांना विश्वासात घेऊन मॅडमनी जिल्हा परिषदेकडून पैसे आणले. इमारतीची दुरुस्ती केली. शाळेच्या आवारात बगिचा विकसित केला. भाजीपाला लावला. तोच भाजीपाला पोषण आहारासाठी उपयोगी आला. अाता मुलांना शिक्षणाची गोडी लागली.

लॅपटाॅप, टॅबमधून शिक्षणाचे धडे
मॅडमनीस्वत:चे ४० हजार रुपये खर्च करून मुलांसाठी लॅपटॉप, टॅब खरेदी केला आणि त्यावर परिसर अभ्यास, मराठी गणिताचे धडे दिले. स्वच्छतेची सवय लावली. त्यांच्यात बदल घडावेत म्हणून त्यांना दैनंदिनी लिहायची सवय लावली. शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार परवा एका चर्चासत्राच्या निमित्ताने सांगलीत येऊन गेले. तेव्हा त्यांनी मगदूम मॅडमच्या या कामाचे कौतुक केले. पण ‘मुलांमध्ये घडलेला बदल, हीच माझ्या कामाची खरी पावती आहे’, असे मगदूम मॅडम सांगतात.