आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Left Leader Comrade Govind Pansare Attacked In Kolhapur

कष्टकरी कामगारांच्‍या लढवय्या नेत्याची आता मृत्यूशी झुंज !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- गेली साठ वर्षे मोलकरणींपासून ते गोकुळ दूध संघातील कर्मचाऱ्यांपर्यंत आणि रेशनवरील धान्यापासून ते टाेलविराेधापर्यंत अनेक मुद्द्यांवर थेट रस्त्यावर उतरून बेडरपणे संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते काॅ. गाेविंद पानसरे ऊर्फ अण्णांची साेमवारी सकाळपासून थेट मृत्यूशीच झुंज सुरू अाहे, तर दुसरीकडे त्यांच्यावर अगदीच अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने घायाळ झालेल्या सुन्न कार्यकर्त्यांच्या मनातील संताप, असे चित्र साेमवारी काेल्हापुरातील अॅस्टर आधार या रुग्णालयाने अनुभवले.
काॅ. गोविंद पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांना आणि डोक्याला जखम झालेल्या उमा वहिनींना अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अॅस्टर आधार या सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत शहरभर आणि काही वेळातच राज्यभर ही बातमी पसरली आणि नेते, कार्यकर्त्यांचा लोंढा रुग्णालयाकडे वाहू लागला. ‘हे झालंच कसं...?’ यासह असंख्य प्रश्न घेऊन वावरणारे अनेक ओळखीचे चेहरे या ठिकाणी वावरत होते, एकमेकांना विचारत होते, धीर देत होते, डोळ्यातलं पाणी पुसत होते.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुजित मिणचेकर, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉक्टरांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांना संयमाच्या सूचना दिल्या. कॉ. दिलीप पोवार, कॉ. रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, शिवाजी परुळेकर यांच्यासह अनेकांचे डोळे डबडबलेले. श्रमिक मुक्ती दलाच्या कॉ. भारत पाटणकरांपासून ते हमालांचे नेते बाबा आढाव यांच्यापर्यंत सर्व जण या रुग्णालयाच्या आवारातच उभे.
माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांची भेट झाली. त्यांना पानसरेंनी सकाळी गप्पा मारायला बोलावले होते. ते घरी पोहोचले आणि त्यांना ही धक्कादायक बातमी समजली. तोपर्यंत पेपर टाकणारी संघटनेतील अनेक पोरं तिथे दाखल झाली. घरेलू कामगार महिला भगिनीही मोठ्या संख्येने आल्या. सर्वपक्षीय नेत्यांच्या वावराने आणि माध्यमांच्या गराड्याने वेगळेच वातावरण निर्माण झाले आणि उमा पानसरे यांची प्रकृती सुधारत असल्याचे पहिले दिलासादायक वृत्त बाहेर आले. दरम्यान, ‘अामचे अण्णा अाजवर काेणत्याही संकटाला डगमगले नाहीत. या प्राणघातक संकटावरही मात करून ते सुखरूपपणे बाहेर येतील,’ असा अाशावाद त्यांचे समर्थक बाेलून दाखवत हाेते. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली. पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची धावपळ सुरू होती. एकीकडे बंदोबस्त तैनात करत असताना, तपासाच्या सूचना देत असताना वातावरण नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली. स्वत: माध्यमांशी न बोलता त्यांनी खासदार महाडिक यांना तशी विनंती केली आणि तब्येतीचा खुलासा केला गेला. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शहरभर निषेध मोर्चे सुरू केले. बंदचे आवाहन केले गेले. पटापट दुकाने बंद झाली. काही काळ शहरातील बससेवाही थांबली. जागोजागी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. यानंतर दुपारी १२ आणि नंतर ४ वाजता रुग्णालयाच्या वतीने डॉ. उल्हास दामले यांनी माहिती दिली. तब्येत गंभीर, पण स्थिर, हीच माहिती त्यांनी दोन वेळा दिली.
पुढील स्‍लाईडवर वाचा धिक्कार आणि हल्लेखारांच्‍या निषेधाविषयी...