आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉर यंत्रणाच बरखास्त करा, अमोल पालेकर यांचे मत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - देशभरात कुठेही व कोणत्याच क्षेत्रासाठी अस्तित्वात नसलेली ‘सेन्सॉर’ची यंत्रणा महाराष्ट्रातील नाटक व सिनेमांवर लादण्यात आली आहे. ही यंत्रणाच बरखास्त करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे परखड मत मांडतानाच नाट्यकलेचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राखायचे असेल तर महाराष्ट्रातील सर्व नाट्यप्रवाह एकत्र आले पाहिजेत. या कामी नाट्यपरिषदेने पुढाकार घेऊन प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी शनिवारी केले.
92 व्या अ. भा. नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालेकर म्हणाले की, ‘घाशीराम कोतवाल’, ‘गिधाडे’, ‘सखाराम बार्इंडर’ या नाटकांना ज्या पद्धतीने आणि ज्या मुद्यावरून विरोध करण्यात आला आणि सेन्सॉरसोबत संघर्ष करावा लागला होता त्या बाबींवर शासनाने डोळसपणे विचार करण्याची गरज आहे. इतर कोणत्याही क्षेत्रात सेन्सॉरशिप नाही. नाटक, सिनेमांसाठीच आहे. ‘मी नथुराम..’, ‘मारुतीच्या हाती शॅम्पेन’, ‘थरारली वीट’ आणि ‘यदा कदाचित’ या नाटकांना सेन्सॉरने परवानगी दिल्यावरही काही तथाकथित संस्कृतीरक्षक आशय आणि शीर्षक बदलण्यास भाग पाडतात या मुद्द्यावरही सर्व निर्माते आणि रंगकर्मीनी एकत्र यायला हवे आणि नाट्यपरिषदेने त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायला हवे तरच नाट्यक्षेत्रातील सर्जनशीलता अबाधित राहील.
नाटक दिवाणखान्याबाहेर यावे : मराठी नाटक हे ढोबळ आणि ठोकळ नेपथ्यात अडकले आहे. कलादिग्दर्शनात तर गरीबपणाच आहे. भव्य-दिव्य अशी डोळे दिपवणारी ‘रतन थियम’सारखी निर्मिती खरे तर झालीच नाही, म्हणूनच मराठी नाटके दिवाणखान्याच्या बाहेर पडत नाहीत. ती दिवाणखान्याबाहेर आली पाहिजेत. नाट्यक्षेत्रात जे पाच प्रवाह काम करीत आहेत त्यातील सर्व सृजनशील रंगकर्मींनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. आज केवळ धंदेवाईक रंगभूमीची चलती आहे, समांतर रंगभूमीतही व्यावसायिकता असतेच त्याचे धंदेवाईकपण नाकारता येत नाही. संमेलनात धंदेवाईक नाट्यप्रवाहातीलच मंडळी झळकत राहतात. त्यामुळेच नाट्यसंमेलनाचा विस्तार सर्वसमावेशक आणि प्रातिनिधीक होण्याची गरज वाटते, अशी अपेक्षाही पालेकर यांनी व्यक्त केली. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे, स्वागताध्यक्ष पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फिरकलेच नाहीत : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार होते, परंतु निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे मुख्यमंत्री संमेलनाकडे फिरकलेच नाहीत.

प्रा. दत्ता भगत यांच्या कामगिरीला तोड नाही
प्रा. दत्ता भगत यांनी रुजवलेल्या दलित नाट्यप्रवाहाला तोड नाही. समकालीन प्रयोगांची वेळीच दखल आवश्यक आहे, पण ते होत नाही. समांतर नाटकांसाठी मुंबईत छोटासा रंगमंच हवा, परंतु तेदेखील आजवर होऊ शकले नाही. दामू केंकरेंचा आक्रोश तसाच विरणार का?
विदेशी बालरंगभूमीवर जे प्रयोग होतात, ते आपल्याकडेही व्हायला हवेत. तसे प्रशिक्षण आपल्या मुलांना दिले तरच भावी पिढीतून यशस्वी नाटककार, कलावंत घडतील.
‘विकिपीडिया’वर मराठी रंगभूमीविषयी अवघ्या एका ओळीत उल्लेख आढळतो. मराठी रंगभूमीची जागतिक पातळीवर दखल घेतली जाण्यासाठी या नाट्यपरिषदेने प्रयत्न करायला हवेत. केवळ पारंपरिक नाट्यप्रवाहांचा विचार त्यासाठी न होता सर्वसमावेशक आणि सर्व नाट्यप्रवाहांचा समावेश त्यात करायला हवा.
मराठी नाटक हे ‘प्रवासी’ आहे. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनकौशल्य आणि तंत्रावर ‘आयआयएम’ तसेच अन्य संस्थांमधील अभ्यासासाठीही विचार होण्यासाठी नाट्यपरिषदेने पुढाकार घेतला पाहिजे.
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचे मराठी चित्रपट महामंडळाला आश्वासन
सोशल मीडियावर सेन्सॉर नाही : सचिन पायलट
मनसेचा सेन्सॉर बोर्डावर हल्ला; संचालक मंडळावर मराठी व्यक्ती नसल्याचा राग